Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'महाविकास आघाडी विधानपरिषदेच्या 17 जागा लढवणार'; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे मोठं विधान

'महाविकास आघाडी विधानपरिषदेच्या 17 जागा लढवणार'; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे मोठं विधान

मुंबई :महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 17 रिक्त जागांसाठी निवडणूक घेतली जाणार आहे. त्यानुसार, महायुतीकडून जागावाटप झाले आहे. या जागावाटपानंतर शिवसेनेच्या वर्तुळात नाराजीचे वातावरण आहे.

त्यातच आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या १६ जागा व नागपूरच्या एका जागेवरील पोटनिवडणूक अशा सर्व १७ जागा महाविकास आघाडी लढवणार आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

विधान परिषद निवडणुकीच्या जागा वाटपासाठी काँग्रेस पक्षाचे मुख्यालय असलेल्या टिळक भवन येथे महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी निवडणूक लढवण्याबाबत महत्त्वपूर्ण भाष्य केले. महाविकास आघाडी सर्व १७ जागा लढवणार आहे. दोन दिवसात या संदर्भात पुन्हा एकदा बैठक घेण्यात येईल आणि सर्वसंमतीने जागा वाटपाचा निर्णय जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

Legislative Council Election : एकनाथ शिंदेंची नाराजी कायम; भाजप ठाम, शिवसेनेची मात्र कोंडी

दरम्यान, सपकाळ यांनी भाजपवर टीका केली. ते म्हणाले की, भाजप लोकशाही मानत नाही, त्यांनी निवडणुकीत घोडेबाजार मांडला आहे, ‘पैसा फेक तमाशा देख’चा दुसरा अंक सुरु झाला असून, ५ लाख रुपये आगाऊ देऊन नगरसेवकांची पळवापळवी केली जात आहे, अशा परिस्थितीत लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी महाविकास आघाडी एकजूटपणे विधान परिषदेची निवडणूक लढवणार आहे. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून कोणताही विसंवाद अथवा तिढा नाही तर सुसंवाद आहे, तर दुसरीकडे ‘गँग्ज ऑफ ट्रिपल इंजिन’ सरकारमध्येच जागा वाटपावरून धुसफूस सुरु आहे, असेही सपकाळ म्हणाले.

शेतकऱ्यांसाठी भरीव मदत घेऊनच या

कांद्याला ३ हजार रुपये हमीभाव द्यावा या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे महाविकास आघाडीने मोठे आंदोलन केले, तीन तास रास्ता रोको करण्यात आला. भाजप-महायुती सरकारने पोलिसांच्या माध्यमातून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला पण शेतकऱ्यांची एकजूट व ताकदी पाहून फडणवीस सरकार हादरले म्हणूनच बुधवारी तातडीने दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासोबत कांदा प्रश्नावर बैठक होत आहे. पण या बैठकीतून रिकाम्या हाताने परत येऊ नका, शेतकऱ्यांसाठी भरीव मदत घेऊनच या, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला

दुसरीकडे, राज्यातील विधान परिषदेच्या १७ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. महायुतीच्या या जागावाटपात अखेर भाजप सर्वाधिक १२ जागांवर उमेदवार उभे करणार आहे. तर शिवसेना शिंदे गटाला ४ आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला १ जागा मिळणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra