नवी दिल्ली :नरेंद्र मोदीसरकारने तरुणांसाठी शिक्षणापासून रोजगारापर्यंतचा मार्ग रोखला आहे आणि संपूर्ण पिढीचे भविष्य धोक्यात आणले आहे, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी केला.
‘नीती आयोगा’च्या आकडेवारीचा संदर्भ देत खर्गे यांनी सांगितले की, १५ ते २९ वयोगटातील ८.७ कोटी तरुण ना शिक्षण घेत आहेत, ना नोकरी करत आहेत, ना कोणतेही प्रशिक्षण घेत आहेत. त्यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले, यापैकी सुमारे ८८ टक्के तरुण घरगुती कामांमध्ये गुंतलेले आहेत. ‘पिरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हे’चा उल्लेख करत त्यांनी नमूद केले की, तरुणांमधील बेरोजगारीचा दर १५.६ टक्के आहे, तर तरुणींमधील बेरोजगारीचा दर १९.५ टक्क्यांवर पोहोचला आहे.
पदवीधर तरुणांसाठी नोकऱ्या कुठे आहेत, असा प्रश्न खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला. त्यांनी दावा केला की, २० ते २९ वयोगटातील बेरोजगार व्यक्तींमध्ये पदवीधरांचे प्रमाण ६७ टक्के आहे, तर १५ ते २५ वयोगटातील पदवीधरांमधील बेरोजगारीचा दर जवळपास ४० टक्के आहे.
नोकऱ्यांचा अभाव; भविष्य धोक्यात
महागडे आणि अपुरे शिक्षण, प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटना, भरती प्रक्रियेतील विलंब, कौशल्यांमधील वाढती तफावत आणि दर्जेदार नोकऱ्यांचा अभाव यामुळे संपूर्ण पिढीचे भविष्य धोक्यात आले आहे. सरकारच्या धोरणांमुळे शिक्षण महाग झाले असून, परीक्षांवरील तरुणांचा विश्वास कमी झाला आहे, असा आरोपही खर्गे यांनी केला.
नोकऱ्या देण्याच्या आश्वासनाचे काय?
दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याच्या आश्वासनाचे काय झाले, असा सवाल काँग्रेस अध्यक्षांनी उपस्थित केला. त्यांच्या मते, या आश्वासनानुसार १२ वर्षांत २४ कोटी नोकऱ्या निर्माण व्हायला हव्या होत्या.
2029 मध्ये मोदी पंतप्रधान नसतील
आगामी काळात देशात सत्ताबदल निश्चितपणे होईल आणि त्यासाठी विरोधी पक्ष किंवा काँग्रेस कारणीभूत ठरणार नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या 12 वर्षांतील कारभारामुळेच हा बदल घडेल, असा दावा राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

