- पावसाळ्यात ‘हे’ चटपटीत पदार्थ खाणे टाळा
- अन्यथा वाढू शकतो फूड पॉइझनिंगचा धोका
- स्वतःची अशी घ्या काळजी
पावसाळा सुरू झाला की गरमागरम आणि चटपटीत पदार्थ खाण्याचा मोह अनेकांना आवरत नाही.
मात्र याच काळात वातावरणातील आर्द्रता वाढल्यामुळे जीवाणू, विषाणू आणि बुरशीची वाढ झपाट्याने होते. त्यामुळे उघड्यावर ठेवलेले अन्न, दूषित पाणी किंवा अस्वच्छ पद्धतीने तयार केलेले खाद्यपदार्थ खाल्ल्यास फूड पॉइझनिंग, पोटदुखी, उलट्या, जुलाब, ताप आणि डिहायड्रेशनसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे मान्सूनमध्ये बाहेरचे अन्न खाताना विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याचे आरोग्यतज्ज्ञ सांगतात.
Sudden Weight Gain: अचानक वजन वाढतंय? शरीरातील 'हे' गंभीर संकेत ओळखायला करू नका उशीर
पाणीपुरी
पाणीपुरीचे पाणी अनेकदा बराच वेळ आधी तयार करून ठेवले जाते. त्यासाठी वापरलेले पाणी किंवा बर्फ स्वच्छ नसेल तर पोटाच्या संसर्गाचा आणि फूड पॉइझनिंगचा धोका वाढू शकतो.
चाट
भेळ, आलू चाट, दहीभल्ले किंवा इतर चाटमधील चटण्या, दही आणि मसाले उघड्यावर ठेवले जातात. पावसाळ्यात त्यामध्ये जीवाणूंची वाढ वेगाने होऊ शकते.
कापलेली फळे
रस्त्याच्या कडेला विकली जाणारी आधीच कापून ठेवलेली फळे धूळ, माश्या आणि दूषित वातावरणाच्या संपर्कात येतात. त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता वाढते.
तळलेले पदार्थ
पकोडे, समोसे, कचोरी यांसारखे पदार्थ अनेकदा पुन्हा-पुन्हा वापरलेल्या तेलात तळले जातात. त्यामुळे अपचन, गॅस आणि अॅसिडिटीचा त्रास वाढू शकतो.
मोमोज
बाहेर मिळणाऱ्या मोमोजमधील सारण नेहमी ताजे असेलच असे नाही. जुनी भाजी किंवा चिकन वापरल्यास हानिकारक जीवाणू वाढू शकतात.
‘या’ ही पदार्थांपासून ठेवा अंतर
- रस्त्यावरील उघड्यावर तयार केलेले फळांचे ज्यूस.
- उघड्यावर ठेवलेल्या मिठाया.
- अर्धवट शिजवलेले मांस आणि सीफूड.
- उघड्या भांड्यात ठेवलेल्या चटण्या आणि सॉस.
- रस्त्यावरील आईस्क्रीम किंवा रंगीत बर्फाचे गोळे, कारण दूषित पाणी किंवा अयोग्य साठवणुकीमुळे संसर्गाचा धोका वाढू शकतो.
स्वतःची अशी घ्या काळजी
पावसाळ्यात शक्यतो ताजे, गरम आणि स्वच्छ अन्न खावे. उकळलेले किंवा शुद्ध पाणी पिण्याला प्राधान्य द्यावे. बाहेरचे अन्न खायचे असल्यास स्वच्छता, अन्नाची गुणवत्ता आणि ते ताजे आहे का याची खात्री करावी. योग्य आहार आणि स्वच्छतेच्या सवयी अंगीकारल्यास पावसाळ्यातील संसर्गजन्य आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकतो.टीप - हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

