Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मुंबई उपनगरीय Railway तील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; तातडीच्या उपाययोजनांची खा. संजय दिना पाटील यांची मागणी

मुंबई उपनगरीय Railway तील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; तातडीच्या उपाययोजनांची खा. संजय दिना पाटील यांची मागणी

  • रेल्वेतील वाढत्या सुरक्षेच्या समस्यांवर खा. संजय दिना पाटील यांनी आवाज उठवला
  • तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी
  • रेल्वे गर्दी नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना
मुंबई/नीता परब : मुंबई उपनगरीय रेल्वेतील वाढत्या सुरक्षेच्या समस्या, प्रशासनातील निष्क्रियता आणि प्रवाशांच्या गैरसोयींबाबत केंद्रीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य खा.
संजय दिना पाटील यांनी आवाज उठवला आहे. लाखो प्रवाशांची जीवनरेखा असलेल्या रेल्वे व्यवस्थेतील त्रुटींवर त्यांनी नाराजी व्यक्त करत तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली. नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्यांनी हा मुद्दा प्रभावीपणे मांडला आहे. केंद्रीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य खा. संजय दिना पाटील यांनी रेल्वे प्रवासी सुरक्षेचा मुद्दाही अत्यंत ठोसपणे मांडला. मुंबई लोकलमधील प्रचंड गर्दी ही धोकादायक पातळीवर पोहोचली असून त्यामुळे धक्काबुक्की, वादविवाद आणि अपघातांची शक्यता सातत्याने वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. २४ जानेवारी २०२६ रोजी मालाड येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेचा उल्लेख करत, या घटनेने रेल्वे सुरक्षा यंत्रणेतील गंभीर उणिवा समोर आल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

'अर्थ अवर' पाळण्यास मुंबईकर निरुत्साही! पर्यावरण विषयावर प्रचंड खल, चर्चेचे ठोस कृतीत रूपांतर होईना

रेल्वे गर्दी नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना

रेल्वे गर्दी नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना अत्यंत आवश्यक आहेत. यावर उपाय म्हणून सीसीटीव्ही निगराणी वाढवणे, आरपीएफ जवानांची तैनाती करणे व प्रभावी सुरक्षा उपाय तत्काळ राबवण्याची मागणी खा.संजय दिना पाटील यांनी केली आहे.

महिलांच्या सुरक्षित वाढ होणे गरजेचे

याच अनुषंगाने महिलांच्या सुरक्षेचा अत्यंत गंभीर मुद्दयावरही त्यांनी जोरदार टीका करुन प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. डिसेंबर २०२५ मध्ये ट्रेन क्रमांक २२१५८ (एमएस-सीएसएमटी सुपरफास्ट एक्सप्रेस) मध्ये एका महिला प्रवाशीसह तिच्या अल्पवयीन मुलांशी ड्युटीवरील तिकीट तपासणीसाकडून झालेल्या गैरवर्तनाचा गंभीर प्रकार समितीच्या निदर्शनास आणून दिला. मुलांची नावे चुकीच्या पद्धतीने 'डीबोर्ड' दाखवून त्यांच्या जागा अन्य प्रवाशांना देण्यात आल्या, मध्यरात्री सुमारे २.३० वाजता त्यांना जबरदस्तीने उठवून जागा रिकामी करण्यास भाग पाडले. या प्रकारामुळे महिला व मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे खा. संजय दिना पाटील यांनी सांगितले. या प्रकरणी अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या उत्तरदायित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेची उच्चस्तरीय, वेळबद्ध चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच महिलांच्या आणि मुलांच्या रात्रीच्या प्रवासासाठी विशेष सुरक्षात्मक उपाययोजना राबवाव्यात, अशी ठाम मागणी त्यांनी केली.

प्लॅटफॉर्म आणि ट्रेन यामधील अंतर धोकादायक

भांडुप, घाटकोपर, मुलुंड, दादर व ठाणे या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममधील धोकादायक अंतरामुळे अनेक अपघात घडतात. वाढत्या प्रवासी संख्येच्या पार्श्वभूमीवर हा धोका अधिक गंभीर बनत असून सर्व स्थानकांवरील प्लॅटफॉर्मची उंची तातडीने वाढविण्याची गरज आहे. सणासुदीच्या काळात तिकीट मिळण्यात होणाऱ्या अडचणींचाही मुद्दा उपस्थित करुन, रेल्वे प्रशासनाने पूर्वनियोजन करून विशेष रेल्वे गाड्या सुरू कराव्यात, विशेषत, मुंबईहून कोकण, विदर्भ, दक्षिण भारत आणि उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी अतिरिक्त सेवा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी खा. संजय दिना पाटील यांनी केली. तसेच, २०२० पासून बंद असलेली रत्नागिरी-दादर पॅसेंजर सेवा व कोविड काळापासून बंद असलेली सह्याद्री एक्सप्रेस (सीएसएमटी-कोल्हापूर) पुन्हा सुरु करण्यात यावी. या सेवा प्रादेशिक संपर्क आणि सामान्य नागरिकांच्या सोयीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी नमूद केले.

रिक्त असलेली पदे तातडीने भरण्याची गरज

रेल्वे भरती प्रक्रियेतील त्रुटींवरही भाष्य करत त्यांनी मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेली पदे तातडीने भरण्याची गरज असल्याचे सांगितले. असिस्टंट लोको पायलट, ट्रॅक मेंटेनर आणि तंत्रज्ञ यांसारख्या महत्त्वाच्या पदांवर पारदर्शक व वेळबद्ध पद्धतीने भरती व्हावी, तसेच स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे, प्रशिक्षण आणि कौशल्य विकासाच्या बाबतीतही सुधारणा करण्यावर भर देत नवीन कर्मचाऱ्यांना व्यावहारिक प्रशिक्षण, नियमित सुरक्षा प्रशिक्षण आणि लोको पायलटांसाठी आधुनिक सिम्युलेटर-आधारित प्रशिक्षण सुरू करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
ऑगस्ट २०२४ पासून विविध सार्वजनिक प्रश्नांवर माझ्याकडून पाठवलेल्या पत्रांना अद्याप कोणतेही उत्तर किंवा स्वीकृती मिळाली नसल्याचे नमूद करत, ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले. तक्रार निवारण यंत्रणा अधिक सक्षम करून पत्रव्यवहाराची स्वीकृती, ट्रॅकिंग आणि वेळबद्ध प्रतिसाद यासाठी प्रभावी प्रणाली विकसित करण्याची मागणी करण्यात आली.

रेल्वेच्या आधुनिकीकरणावर विशेष भर देणे गरजेचे

रेल्वेच्या आधुनिकीकरणावर विशेष भर देत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित निगराणी प्रणाली, प्रिडिक्टिव मेंटेनन्स यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याचे आवाहन करण्यात आले. भारतीय रेल्वे ही देशाच्या गतिशीलतेची कणा आहे. प्रवाशांची सुरक्षा, सन्मान आणि सुविधा सुनिश्चित करणे हीच सर्वोच्च प्राथमिकता असली पाहिजे, असे ठाम मत केंद्रीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य खा.संजय दिना पाटील यांनी शेवटी सांगितले. या सर्व मागण्यांकडे केंद्र सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या बाबतचे पत्र त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैश्णव यांना दिले आहे.

जिल्हा परिषद शाळाही आता होणार स्मार्ट; अभियानाला राज्यात सुरुवात

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra