Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नागपुरातील तलावांमध्ये वेगाने वाढतेय जलपर्णी; महापालिकेचा प्रयोग ठरतोय यशस्वी

नागपुरातील तलावांमध्ये वेगाने वाढतेय जलपर्णी; महापालिकेचा प्रयोग ठरतोय यशस्वी

नागपूर : शहरातील तलावांमध्ये वेगाने वाढणारी जलपर्णी ही दीर्घकाळापासून नागपूरसाठी पर्यावरणीय डोकेदुखी मानली जात होती. जलप्रवाह अडवणे, पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी करणे, दुर्गंधी आणि डासांच्या वाढीस पोषक परिस्थिती निर्माण करणे अशा अनेक समस्यांमुळे ती प्रशासनासाठी आव्हान ठरत होती.

मात्र, महापालिकेच्या सामाजिक विकास विभागाने याच जलपर्णीचे उत्पन्नाच्या साधनात रूपांतर करून पर्यावरण आणि रोजगार यांचा अभिनव संगम साधला आहे.

अवघ्या वर्षभरात हा प्रयोग ग्राहकांपर्यंत पोहोचला आहे. शहरातील स्वयंसहायता गटांसाठी तो आशादायी मॉडेल ठरत आहे. प्रकल्पांतर्गत स्वयंसहायता गटांतील ११० महिलांना विविध टप्प्यांमध्ये प्रशिक्षण दिले. त्यापैकी १०० महिलांना तलावांमधून जलपर्णी संकलन, वाळवणे, फायबर आणि दोरा तयार करणे तसेच लूम आणि रोलर यंत्रांचे संचालन याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले. उर्वरित १० महिलांना शिवणकलेचे विशेष प्रशिक्षण देऊन तयार झालेल्या फायबरपासून आकर्षक आणि उपयोगी वस्तू तयार करण्याचे कौशल्य विकसित केले. सध्या क्लस्टरमध्ये ४० हून अधिक प्रकारच्या पर्यावरणपूरक वस्तू तयार केल्या जात आहेत.

Mumbai News: आरे स्टॉलधारकांना दिलासा ! पुनर्वसनासह स्वतंत्र धोरणासाठी महापालिका प्रशासन सकारात्मक

फाईल होल्डर, लॉन्ड्री बॅग, हस्तनिर्मित पर्स, शॉपिंग बॅग, गिफ्ट पॅकिंग साहित्य आणि इतर दैनंदिन वापराच्या वस्तूंना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या वस्तू सीताबर्डी येथील मनपा स्वयंसहायता गट शोरूममध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. स्थानिक बाजारपेठेत त्यांची मागणी वाढू लागली आहे. महिलांना केवळ उत्पादनापुरते मर्यादित न ठेवता दीर्घकालीन स्वयंरोजगार मिळावा, यासाठी मनपाने स्वतंत्र प्रशिक्षण यंत्रणा उभारली आहे.

जलपर्णीच्या बॅगमध्ये दिला होता अर्थसंकल्प

मनपाच्या अर्थसंकल्पीय सभेत महापौर, उपमहापौर, सभापती आणि नगरसेवकांना अर्थसंकल्पाच्या प्रती जलपर्णीपासून तयार केलेल्या बॅग्जमध्ये दिल्या होत्या. त्यावेळी कविवर्य सुरेश भट सभागृहात या प्रकल्पाच्या यशाबाबत चर्चा रंगली होती. अवघ्या महिनाभरातच या उपक्रमाचे प्रत्यक्ष परिणाम दिसू लागले आहे. नागपूरने कचऱ्यातून कला आणि जलपर्णीच्या पर्यावरणीय समस्येतून रोजगार निर्माण करण्याचा महत्त्वपूर्ण मार्ग शोधल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

आर्थिक स्वावलंबनाला बळकटी देण्याचेही काम सुरू

मनपा प्रशासनाने आता या उत्पादनांच्या विपणनावर विशेष भर देण्याचा निर्णय घेतला आहे. ई-कॉमर्स, प्रदर्शन आणि शासकीय खरेदी प्रक्रियेद्वारे या वस्तूंना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहे. विविध शासकीय योजनांची जोड देऊन स्वयंसहायता गटांच्या आर्थिक स्वावलंबनाला बळकटी देण्याचेही काम सुरू आहे.

शिवण व प्रशिक्षण क्लस्टर सुरू

बर्डी, महाल आणि पारडी येथे तीन शिवण व प्रशिक्षण क्लस्टर सुरू केले आहे. प्रत्येक बॅचमध्ये ३० महिलांना प्रथम तीन महिन्यांचे व मूलभूत आणि त्यानंतर तीन महिन्यांचे प्रगत नि कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर महिलांना बँका, सूक्ष्म वित्त संस्था आणि स्वयंसेवी संस्थांशी जोडून कर्ज, बाजारपेठ आणि व्यवसाय मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra