Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
NEET Updates: पेपर लीकच्या अफवांपासून सावध राहा! केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांचे विद्यार्थ्यांना मोठे आवाहन

NEET Updates: पेपर लीकच्या अफवांपासून सावध राहा! केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांचे विद्यार्थ्यांना मोठे आवाहन

केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी ‘NEET PG 2026’ परीक्षेच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला. या वेळी बोलताना त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले की, परीक्षा ही पूर्णपणे पारदर्शक, सुरक्षित आणि विद्यार्थ्यांच्या हिताची असली पाहिजे. परीक्षा प्रक्रियेत कोणत्याही स्तरावर निष्काळजीपणाला जागा नसावी, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

यासोबतच, त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे की, सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांवर पसरणाऱ्या ‘पेपर लीक’सारख्या अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नये आणि केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा. या आढावा बैठकीचा मुख्य उद्देश उमेदवारांना निष्पक्ष आणि विश्वासार्ह परीक्षेचे वातावरण उपलब्ध करून देणे हा आहे.

नीट पीजी २०२६ चे आयोजन ३० ऑगस्ट २०२६ रोजी देशभरात एकाच शिफ्टमध्ये केले जाणार आहे. या वर्षी परीक्षेसाठी २,७३,१८३ विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे, जे गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे १२.५ टक्क्यांनी जास्त आहे. ही परीक्षा ३४० शहरांमधील १,३०० हून अधिक परीक्षा केंद्रांवर पार पडेल. विद्यार्थ्यांची सोय लक्षात घेऊन या वेळी त्यांना तीन राज्यांचे पर्याय देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्यांच्या घराजवळ परीक्षा केंद्र मिळावे आणि प्रवासाचा त्रास कमी व्हावा.

परीक्षा पॅटर्नमध्ये काय बदल झाले?

उमेदवारांना परीक्षेच्या शहराची माहिती परीक्षेच्या सुमारे तीन आठवडे आधी दिली जाईल, जेणेकरून ते वेळेवर प्रवासाचे आणि राहण्याचे नियोजन करू शकतील. तसेच यंदा प्रश्नांची संख्या २०० वरून कमी करून १८० करण्यात आली आहे. परीक्षेचा एकूण कालावधीही २१० मिनिटे असेल, ज्यामुळे प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त वेळ मिळेल. या बदलांचा उद्देश विद्यार्थ्यांवरील वेळेचा ताण कमी करणे आणि त्यांना उत्तम कामगिरीची संधी देणे हा आहे.

Vinoba Digital App: 'विनोबा' अ‍ॅपने बदलला शासकीय शाळांचा चेहरा! विद्यार्थ्यांना कसा होतोय फायदा जाणून घ्या एका क्लिकवर..

सुरक्षेचे काय प्रबंध केले आहेत?

बायोमेट्रिक आणि आयरीस स्कॅन: परीक्षेदरम्यान आधार-आधारित पडताळणी अनिवार्य असेल. जर एखाद्या उमेदवाराच्या बोटांचे ठसे जुळले नाहीत, तर त्याची ओळख डोळ्यांच्या (Iris) स्कॅनद्वारे पटवली जाईल.

इतर सुरक्षा यंत्रणा: सर्व परीक्षा केंद्रांवर CCTV कॅमेरे, बायोमेट्रिक पडताळणी, फ्रिस्कींग, सिग्नल जॅमर आणि लाईव्ह मॉनिटरिंग यांची व्यवस्था असेल.

कर्मचाऱ्यांची नियुक्ती: संपूर्ण प्रक्रिया निष्पक्ष आणि पद्धतशीरपणे पार पडावी यासाठी ६० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाईल.

पेपर लीकवर सरकारने काय म्हटले?

पेपर लीकच्या अफवांवर स्पष्टीकरण देताना आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा म्हणाले की, अंतिम प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्याच्या काही वेळ आधी अत्यंत सुरक्षित आणि एन्क्रिप्टेड डिजिटल प्रक्रियेद्वारे तयार केली जाते. त्यामुळे कोणाकडेही आधीपासूनच प्रश्नपत्रिका असण्याचा दावा पूर्णपणे खोटा, दिशाभूल करणारा असेल. त्यांनी उमेदवारांना सांगितले की, जर परीक्षेशी संबंधित कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा चुकीची माहिती समोर आली, तर त्याची माहिती तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना द्यावी. यामुळे अफवांना आला घालण्यास आणि परीक्षेची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यास मदत होईल.

Can AI Replace Teachers: वर्गात रोबोट शिकवणार? ‘सॅली’च्या वादावरून सुरू झाली शिक्षणाच्या भविष्याची नवी चर्चा!

उमेदवारांसाठी सरकारचा काय संदेश आहे?

आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा म्हणाले की, प्रत्येक उमेदवाराला सुरक्षित, निष्पक्ष आणि तणावमुक्त परीक्षेचा अनुभव देणे हे सरकारचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. यासाठी सर्व संबंधित यंत्रणांना उत्तम समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, त्यांनी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, कोणत्याही अपुष्ट माहितीला किंवा सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या संदेशांना बळी पडू नये आणि केवळ अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा. पारदर्शक व्यवस्था आणि मजबूत सुरक्षेच्या माध्यमातूनच परीक्षा प्रणालीवरील विद्यार्थ्यांचा विश्वास अधिक दृढ होईल, असे सरकारचे मानणे आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra