Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Neral News: मोबाईल टॉवर बॅटरी चोरीचा पर्दाफाश; दोन आरोपी अटकेत, ₹4.78 लाखांचा मुद्देमाल जप्त

Neral News: मोबाईल टॉवर बॅटरी चोरीचा पर्दाफाश; दोन आरोपी अटकेत, ₹4.78 लाखांचा मुद्देमाल जप्त

  • मोबाईल टॉवर मधील बॅटरी चोरणाऱ्या टोळीला अटक..
  • पाच गुन्हे उघड, दोन आरोपी गजाआड
  • ₹4.78 लाखांचा मुद्देमाल जप्त
कर्जत: रायगड जिल्हा पोलिसांच्या नेरळ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत दोन आरोपींना अटक केली आहे.
या कारवाईत रायगड जिल्ह्यातील चार आणि नवी मुंबईतील एका अशा एकूण पाच गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला असून, चोरीस गेलेल्या सुमारे ₹4.78 लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नेरळ पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. या कारवाईत रबीउलइस्लाम तामजुइस्लाम शेख (वय 45) याला अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने साथीदारांच्या मदतीने रायगड आणि नवी मुंबई परिसरातील मोबाईल टॉवरमधून बॅटऱ्या चोरी केल्याची कबुली दिली. तपासात सोनू, आवेस, ‘चिनीदादा’ आणि वृषभ धनराज जैन यांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचेही समोर आले आहे.

तरुणासह त्याच्या आई-वडिलांना बेदम मारहाण; धक्कादायक कारणही आलं समोर

तपासात या टोळीने नेरळ, खालापूर, पेण (रायगड) तसेच नवी मुंबईपरिसरातील विविध मोबाईल टॉवरमधून बॅटऱ्या चोरी केल्याचे निष्पन्न झाले. आरोपींकडून 144 बॅटऱ्या फोडून त्यातील सुमारे 1,800 किलो वजनाचे शिसे (Lead) जप्त करण्यात आले. तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेले वाहनही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ही कारवाई रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशांत वरक, सुशील काजरोळकर, पोलीस हवालदार एस. एम. वाघमारे, आर. बी. केकान, व्ही. आर. वांगणेकर आणि ए. बी. बेंद्रे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. रायगड पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे मोबाईल टॉवर बॅटरी चोरी करणाऱ्या टोळ्यांवर प्रभावी आळा बसण्यास मदत होणार असून, जिल्ह्यात अशा प्रकारच्या गुन्ह्यांविरोधात भविष्यातही कठोर कारवाई सुरू राहील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Rapido RTO Action: रॅपिडो कंपनीच्या संचालकांवर संभाजीनगरात थेट गुन्हा दाखल! अनधिकृत प्रवासी वाहतूक प्रकरणी आरटीओचा मोठा दणका

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra