शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील अलीकडील राजकीय घडामोडींनंतर राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. काही खासदारांनी पक्ष सोडल्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील आणखी आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे दावे सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्यांकडून केले जात आहेत.
अशातच राज्याचे आरोग्यमंत्री आणि शिवसेना नेते प्रकाश आबिटकर यांनी ‘ऑपरेशन टायगर 3’ संदर्भात मोठे विधान केले आहे. पंढरपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना आबिटकर यांनी आगामी काळात आणखी राजकीय घडामोडी होण्याचे संकेत दिले.
‘ऑपरेशन टायगर 3 कधी होईल तेही कळणार नाही’
ऑपरेशन टायगरच्या चर्चेबाबत विचारले असता प्रकाश आबिटकर म्हणाले, “ऑपरेशन टायगर 3 कधी होईल, तेही कळणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या झंझावातात अनेक आमदार आणि माजी मंत्री शिवसेनेत येणार आहेत.”
ते पुढे म्हणाले, “केंद्रात शिवसेनेचा चेहरा कोण असेल, याचा निर्णय शिंदे साहेब राजकीय परिस्थितीनुसार घेतील. ठाकरे गट काय करतो यापेक्षा आमचा भर संघटना अधिक मजबूत करण्यावर आहे.” मात्र, आबिटकर यांनी कोणते आमदार किंवा नेते शिंदे गटात प्रवेश करणार आहेत, याबाबत कोणतीही नावे जाहीर केली नाहीत.
'एक दिवस उद्धव ठाकरेंना आमच्याकडे यावंच लागेल'; रामदास आठवलेंचा दावा, आदित्य ठाकरेंनाही लगावला टोला
एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीबाबतही दिली माहिती
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीबाबतही प्रकाश आबिटकर यांनी माहिती दिली. “धावपळीमुळे शिंदे साहेबांना काहीसा त्रास होत असल्याने डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मात्र ते सतत काम करणारे नेते आहेत. सध्या त्यांना काही दिवस आरामाची गरज आहे,” असे ते म्हणाले.
‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेला पुन्हा उधाण
यापूर्वीही शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी ‘ऑपरेशन टायगर’ सुरू असल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता प्रकाश आबिटकर यांच्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
उद्धव ठाकरेंना रामरक्षा नाहीतर पक्षरक्षा आंदोलनाची गरज; रामदास आठवले यांची टीका
दरम्यान, ठाकरे गटातील आणखी आमदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा सत्ताधारी शिवसेनेकडून केला जात असला, तरी याबाबत संबंधित आमदार किंवा ठाकरे गटाकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे या दाव्यांबाबत पुढील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

