जेवणाची चव वाढवण्यासाठी ताटात वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या वाढल्या जातात. भाज्यांची साल, शेंगदाणे, खोबर किंवा इतर अनेक विविध पदार्थांपासून चटणी बनवली जाते. पण नेहमीच पदार्थापेक्षा काहीतरी हटके आणि टेस्टी खायचे असेल तर झटपट तुम्ही कुरकुरीत पापड चटणी बनवू शकता.
तयार केलेली पापड चटणी चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहे. पापड खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. त्यामुळे पापडाचा वापर करून तुम्ही विविध टेस्टी पदार्थ बनवू शकता. ओल्या चटण्यांसोबतच सुक्या चटणीचे सुद्धा अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. पापडाची चटणी आठवडाभर किंवा त्यापेक्षा जास्त वेळ व्यवस्थित टिकून राहते. नेहमीच भाजी खाऊन कंटाळा आल्यानंतर वेगळं काही तरी खाण्याची इच्छा झाल्यास झटपट तुम्ही पापड चटणी बनवू शकता. लसूण, जवस, मिरची, कांदा , टोमॅटो, डाळं, शेंगदाणे, शेवगा इत्यादी पदार्थांचा वापर करून सुद्धा चटणी बनवली जाते. चला तर जाणून घेऊया पापड चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य - pinterest)
साहित्य:
- पापड
- शेंगदाणे
- लाल सुकी मिरची
- जिरं
- मीठ
- लसूण
- हळद
- लाल तिखट
- पांढरे तीळ
- तेल
कृती:
- पापडाची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, चाट ते पाच पापड गॅसवर भाजून घ्या. पापड भाजताना गॅसची जास्त फास्ट ठेवू नये. यामुळे पापड काळे पडण्याची शक्यता असते.
- कढईमध्ये तेल गरम करून त्यात लसूण पाकळ्या आणि शेंगदाणे खमंग भाजून घ्या. त्यानंतर त्यात पांढरे तीळ आणि लाल सुक्या मिरच्या भाजा.
- मिक्सरच्या भांड्यात भाजून घेतलेले साहित्य आणि पापड, चवीनुसार मीठ घालून जाडसर चटणी वाटून घ्या.
- तयार केलेली चटणी वाटीमध्ये काढा. फोडणीच्या वाटीमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. गरम तेलात जिरं, लाल तिखट आणि
- हळद घालून मिक्स करा आणि तयार केलेल्या चटणीवर फोडणी ओतून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
- तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली झणझणीत पापडाची चटणी. लहान मुलांसह मोठेसुद्धा आवडीने खातील.

