डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा? पायांच्या संसर्गाची लक्षणे?
बुरशीजन्य संसर्ग म्हणजे काय?
उन्हाळा ऋतू संपल्यानंतर सगळेच पावसाच्याप्रतिक्षेत असतात. पाऊस पडल्यानंतर सगळीकडे थंडगार वातावरणात निर्माण होते आणि वाढत्या उष्णतेपासून दिलासा मिळतो.
पावसात थंडावा वाढतो, पण शरीरसंबंधित गंभीर आजारांचा धोका सुद्धा तेवढाच असतो. त्यामुळे शरीराची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. सर्दी, खोकला, ताप, साथीच्या आजारांसोबतच त्वचेसंबंधित समस्या सुद्धा वाढू लागतात. बुरशीजन्य आजार झाल्यामुळे त्वचेवर डाग किंवा लाल चट्टे येऊन त्वचा पूर्णपणे लाल होऊन जाते. पावसाळ्यात हवेमध्ये खूप जास्त आर्द्रता असते. दमट वातावरणामुळे खूप जास्त घाम येतो आणि त्वचा चिकट, तेलकट होऊन जाते. सतत येणाऱ्या घामामुळे कपडे किंवा बूट बराच वेळ ओले राहतात. ओलसरपणा वाढल्यामुळे पायांच्या त्वचेला खाज येते तर काहीवेळा जखमा सुद्धा होण्याची जास्त शक्यता असते.(फोटो सौजन्य - istock)
खड्यांमध्ये साचून राहिलेल्या पाण्यात विषाणू आणि जिवाणू मोठ्या प्रमाणावर वाढू लागतात. चुकून खड्यातील पाण्यात पाय पडल्यास संवेदनशील त्वचा असलेल्या व्यक्तींच्या पायावर लगेच जखमा होऊन पाय खराब होतो. काहीवेळा पायांवर झालेल्या जखमांकडे वेळीच लक्ष दिले जात नाही. यामुळे त्वचेसंबंधित गंभीर आजार सुद्धा होऊ शकतो. खाज सुटणे, लाल पुरळ उठणे इत्यादी लक्षणे दिसू लागल्यानंतर दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला बुरशीजन्य संसर्ग म्हणजे काय? बुरशीजन्य संसर्गची लक्षणे कोणती? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे उपाय केल्यास पायांवरील जखमा लवकर बऱ्या होतील.
बुरशीजन्य संसर्ग म्हणजे काय?
बुरशीजन्य संसर्ग बुरशीमुळे होतो. याचा परिणाम त्वचा, नखे, केस, तोंड आणि शरीराच्या इतर भागांवर सुद्धा होण्याची जास्त शक्यता असते. बुरशी उबदार आणि दमट वातावरणात झपाट्याने वाढते. त्यामुळे बुरशी वाढण्यासाठी पावसाळा ऋतू पोषक ठरतो. त्यामुळे बुरशीजन्य संसर्गची लागण झाल्यानंतर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करावे. सोशल मीडिया किंवा इतर कुठेही पाहिलेल्या गोळ्या, क्रीम न घेता योग्य ते उपचार करावेत.
बुरशीजन्य संसर्गाची लक्षणे:
- त्वचेवर लालसर पुरळ उठणे
- अंगाला खाज येणे
- जळजळ किंवा टोचल्यासारखी संवेदना होणे
- त्वचा तडकणे किंवा सोलवटणे
- पायांना दुर्गंधी येणे
- नखे पिवळी पडणे आणि जाड होणे
- तोंडात पांढरे डाग पडणे.
डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
बुरशीजन्य संसर्ग झाल्यानंतर एक आठवड्यापेक्षा जास्त दिवस संसर्ग टिकून राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण वारंवार उद्भवलेला त्वचा संसर्ग वेगाने पसरण्याची जास्त शक्यता असते. पावसाळ्यात मधुमेहाने त्रस्त असलेल्या रुग्णांनी स्वतःची खूप जास्त काळजी घ्यावी. कारण मधुमेहाच्या रुग्णांना झालेल्या जखमा लवकर बऱ्या होत नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात कुठेही जाऊन आल्यानंतर सर्वप्रथम पाय पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत. संपूर्ण शरीर कोरडे असणे आवश्यक आहे. नियमित अंघोळीच्या पाण्यात मीठ टाकल्यास पायांवर वाढलेल्या जखमा हळूहळू बऱ्या होतील.
टीप - हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

