Dailyhunt
प्रताप सरनाईकांनी केली वल्लभनगर बसस्थानकाची पाहणी; ST प्रशासनाला दिले 'हे' महत्वाचे निर्देश

प्रताप सरनाईकांनी केली वल्लभनगर बसस्थानकाची पाहणी; ST प्रशासनाला दिले 'हे' महत्वाचे निर्देश

पिंपरी : दमून-भागून आलेल्या चालक व वाहकांना योग्य विश्रांती मिळावी यासाठी त्यांच्या विश्रांतीगृहांमध्ये उत्तम सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. स्वच्छतागृहे टापटीप व स्वच्छ ठेवावीत, कर्मचाऱ्यांसाठी पिण्याचे शुद्ध पाणी तसेच अंघोळीसाठी गरम पाण्याची सोय करावी, अशा घरगुती सुविधांची निर्मिती करावी, असे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्थानिक एसटी प्रशासनाला दिले आहेत.

ते पुणे विभागातील वल्लभनगर बसस्थानकाला भेट दिली असता बोलत होते.

"चालक-वाहक हा एसटीचा कणा आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कष्ट करून तो दररोज राज्यातील सुमारे ५० ते ५५ लाख प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. या कर्मचाऱ्यांना कर्तव्य पूर्ण झाल्यानंतर घरच्यासारख्या सुविधा मिळाल्यास ते अधिक उत्साहाने सेवा बजावतील," असा मोलाचा सल्ला मंत्री सरनाईक यांनी दिला.

बसस्थानकाची पाहणी करताना त्यांनी अनेक वर्षे बंद असलेले व्यापारी गाळे महिला बचत गटांना व होतकरू उद्योजक तरुणांना अत्यल्प भाड्यात उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. यामुळे एसटी महामंडळाचा महसूल वाढेल तसेच प्रवासी व कर्मचाऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील, असे त्यांनी नमूद केले.

महामार्गांवरील हॉटेल-मोटेलप्रमाणेच एसटी बसस्थानकांवरील उपहारगृहांमध्येही सर्व प्रवाशांना ४० रुपयांत चहा-नाश्ता देण्याची योजना १ जूनपासून सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी केली. या पाहणीदरम्यान खासदार श्रीरंग बारणे, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच एसटीचे अधिकारी उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा : छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी शिवसेनेला मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का? काँग्रेसचा सवाल

प्रताप सरनाईक यांचा विक्रेत्यांना सज्जड दम

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर बसस्थानकांवरील प्रवाशांना 'नाथजल'ची थंडगार पाण्याची बाटली केवळ १५ रुपयांनाच मिळाली पाहिजे. जर कोणीही अधिक दराने विक्री करताना आढळल्यास संबंधितांचा विक्री परवाना थेट रद्द केला जाईल, असा कडक इशारा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी (३० एप्रिल) सकाळी पुणे विभागातील लोणावळा बसस्थानकास अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी बसस्थानकावरील प्रवासी सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणी दरम्यान, प्रवाशांशी संवाद साधत असताना 'नाथजल'च्या एक लिटर बाटलीसाठी २० रुपये उकळले जात असल्याचे काही प्रवाशांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. याची गंभीर दखल घेत सरनाईक यांनी संबंधित विक्रेत्याला जाब विचारला आणि तात्काळ स्पष्ट दरफलक लावण्याच्या सूचना दिल्या. यापुढे १५ रुपयांची बाटली महाग विकल्यास परवाना रद्द करण्याची तंबीही त्यांनी यावेळी दिली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra