Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
प्रेमात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीच्या वडिलांचीच केली हत्या; झोपेत असतानाच कुऱ्हाडीने सपासप वार केले अन्.

प्रेमात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीच्या वडिलांचीच केली हत्या; झोपेत असतानाच कुऱ्हाडीने सपासप वार केले अन्.

नागपूर : मुलीला पुन्हा पतीकडे पाठवण्याचा आग्रह धरणाऱ्या वडिलांची झोपेतच कुऱ्हाडीने हत्याकेली. ही घटना मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोधनी परिसरात घडली. मुलीच्या प्रियकराने मध्यरात्री घरात घुसून झोपेत असलेल्या बांधकाम मिस्त्रीच्या डोक्यावर सपासप वार केले.

याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून काही तासांत आरोपीला अटक केली.

मेहताबसिंग चौधरी (वय ४३, रा. जमील सोसायटी, गोधनी) असे मृताचे नाव आहे. पत्नी गीता चौधरी (वय ४०) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. रोहित गौतम (वय २५, रा. मानकापूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहताबसिंग हे बांधकाम मिस्त्री म्हणून काम करत होते. ते पत्नी आणि आईसोबत राहत होते. त्यांना दोन मुली आणि मुलगा आहे. तिघांचेही लग्न झाले आहे. धाकटी मुलगी विवाहानंतर मध्यप्रदेशात पतीसोबत राहत होती. मात्र, पतीकडून होणाऱ्या मारहाणीमुळे तिचे रोहितशी प्रेमसंबंध जुळले. रोहित आणि तिने लग्न करण्याचे ठरवले. ती पतीचे घर सोडून रोहितसोबत राहू लागली. मात्र, मेहताबसिंग यांनी तिची समजूत काढून पुन्हा पतीकडे पाठवले.

काही दिवसांतच ती पुन्हा रोहितकडे परत आली. सध्या ती गर्भवती आहे. यावेळीही मेहताबसिंग तिला पतीकडे परत पाठवण्याच्या भूमिकेवर ठाम होते. याच कारणावरून रोहितच्या मनात संताप निर्माण झाला. मेहताबसिंग हेच प्रेमसंबंधातील अडथळा असल्याचे समजून रोहितने त्यांची हत्या करण्याचा कट रचला. गुरुवारी मध्यरात्री सुमारे १ वाजता तो घरात शिरला.

झोपेत असतानाच कुऱ्हाडीने वार

झोपेत असलेल्या मेहताबसिंग यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. आरडाओरडा आणि आवाजाने पत्नी व आई जाग्या झाल्या. तोपर्यंत आरोपी घटनास्थळावरून पसार झाला होता. घरात सर्वत्र रक्त सांडलेले होते.

सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपी जेरबंद

घटनेची माहिती मिळताच मानकापूर पोलिसांसह गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनायक गोल्हे आणि पथकाने घटनास्थळी भेट दिली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासताना कॅमेऱ्यात आरोपी भिंतीवरून जाताना दिसला. त्यावरून त्याची ओळख पटवून पोलिसांनी घरातून ताब्यात घेतले. तपासात हत्येनंतर आरोपीने कपडे बदलल्याचे तसेच गुन्ह्यात वापरलेली कुऱ्हाड नाल्यात फेकल्याचे समोर आले. पोलिसांनी आरोपीला घटनास्थळी नेऊन गुन्ह्यातील साहित्य जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, पुढील तपास सुरू आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra