- ट्रम्प यांचा 'प्रोजेक्ट फ्रीडम' इराणने धुडकावला
- शस्त्रसंधीला धोका
- सागरी वर्चस्वाची लढाई
Trump Project Freedom Iran : जागतिक राजकारणातील सर्वात संवेदनशील भाग असलेल्या मध्य-पूर्वेत पुन्हा एकदा युद्धाचे ढग दाटून आले आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump) यांनी नुकतीच 'प्रोजेक्ट फ्रीडम'ची घोषणा केली आहे, ज्याचा उद्देश होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेली आंतरराष्ट्रीय जहाजे मुक्त करणे हा आहे. मात्र, ट्रम्प यांच्या या हालचालीला इराणने कडाडून विरोध केला असून, अमेरिकेचा हा 'मानवतावादी' मुखवटा नसून ती लष्करी दादागिरी असल्याचे म्हटले आहे. या वादामुळे जागतिक तेल पुरवठा आणि सागरी सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Mayon Volcano: फिलीपिन्सचा सर्वात सक्रिय ज्वालामुखी पुन्हा जागृत; आकाशात राखेचे साम्राज्य अन् हजारो लोकांचे स्थलांतर, VIDEO VIRAL
इराणचा कडक पवित्रा: 'अमेरिकेने लक्ष्मणरेषा ओलांडू नये'
इराणच्या संसदेच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण समितीचे प्रमुख इब्राहिम अझीझी यांनी या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अझीझी यांच्या मते, होर्मुझची सामुद्रधुनी ही इराणची सार्वभौम भूमी आहे आणि तिथे अमेरिकन नौदलाचा वावर हा आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन आहे. 'ट्रम्प यांच्या दिशाभूल करणाऱ्या सोशल मीडिया पोस्टवर जागतिक सागरी व्यवस्था ठरणार नाही. अमेरिकेने जर आमच्या जलक्षेत्रात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, तर तो शस्त्रसंधी कराराचा भंग मानला जाईल आणि त्याचे परिणाम गंभीर होतील,' असा सज्जड दम अझीझी यांनी दिला आहे.
credit - social media and Twitter
काय आहे ट्रम्प यांचा 'प्रोजेक्ट फ्रीडम'?
डोनाल्ड ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल'वर एका पोस्टद्वारे 'प्रोजेक्ट फ्रीडम' (Project Freedom) उपक्रमाची घोषणा केली होती. त्यांच्या दाव्यानुसार, अनेक देशांनी आपल्या जहाजांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अमेरिकेकडे मदतीची मागणी केली आहे. ही मोहीम सोमवारी सकाळी सुरू होणार असून, अमेरिकन प्रतिनिधींच्या देखरेखीखाली प्रतिबंधित क्षेत्रातील जहाजे आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढले जाईल. ट्रम्प यांनी या मोहिमेचे वर्णन 'मानवतावादी' असे केले असले, तरी इराणच्या मते हा त्यांच्या सागरी वर्चस्वावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न आहे.
credit - social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Hantavirus outbreak 2026 : समुद्राच्या मध्यभागी भयानक विषाणूचा हल्ला; आलिशान क्रूझवर 3 प्रवाशांचा मृत्यू, WHOचा सतर्कतेचा इशारा
होर्मुझचे महत्त्व आणि जागतिक चिंता
होर्मुझची सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाची ऑईल शिपिंग लेन आहे. जगातील एकूण तेल पुरवठ्याचा २०% पेक्षा जास्त भाग याच मार्गावरून जातो. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षामुळे या मार्गावर अनिश्चितता पसरली आहे. इराणने स्पष्ट केले आहे की, ते युद्धपूर्व स्थितीत परत जाणार नाहीत आणि या मार्गाचे व्यवस्थापन केवळ इराण आणि ओमानच्या हातातच राहील. जर अमेरिकेने आपल्या नौदलाचा वापर करून या भागात घुसखोरी केली, तर जागतिक तेल बाजार कोसळण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
कोंडी फुटणार की पुन्हा संघर्ष पेटणार?
सध्या अमेरिका आणि इराण यांच्यात कागदी युद्ध सुरू असले, तरी जमिनीवरची परिस्थिती अत्यंत स्फोटक आहे. 'प्रोजेक्ट फ्रीडम' अंतर्गत अमेरिकन नौदल प्रत्यक्षात तिथे उतरल्यास इराणकडून लष्करी प्रत्युत्तर मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे केवळ दोन देशांमधील शस्त्रसंधीच मोडणार नाही, तर पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने युद्ध सुरू होण्याची भीती आहे. ट्रम्प यांच्या आक्रमक धोरणामुळे इराणच्या सत्ताधाऱ्यांमध्ये संतापाची लाट असून, पुढील ४८ तास जागतिक राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

