Dailyhunt
Pune Crime : पुण्यातील पर्वतीत दोघांवर शस्त्राने सपासप वार; नेमकं काय घडलं?

Pune Crime : पुण्यातील पर्वतीत दोघांवर शस्त्राने सपासप वार; नेमकं काय घडलं?

पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. वैमनस्यातून दोन तरुणांवर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना पुण्यातील पर्वती परिसरात घडली आहे.

खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून, साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओम सुधीर वैद्य (वय १९, रा. टिकेकर वाडा, पर्वती गाव), अथर्व सचिन चव्हाण (वय १९) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मोहित अरुण चक्रनारायण (वय ३८, रा. लक्ष्मीनगर, पर्वती) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वैद्य याने पर्वती पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, वैद्य आणि आरोपींमध्ये वाद झाले होते. २८ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास वैद्य आणि चव्हाण हे लक्ष्मीनगरमधील प्रेमळ विठ्ठल मंदिर परिसरात थांबले होते. त्यावेळी आरोपी चक्रनारायण आणि साथीदारांनी शिवीगाळ केली. वैद्य आणि चव्हाण यांच्यावर शस्त्राने वार करुन त्यांना बॅटने मारहाण केली. या प्रकरणात चक्रनारायण याच्याबरोबर असलेल्या एका महिलेसह अल्पवयीनांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक पवार अधिक तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : पुण्यात भाजप कार्यकर्ता हत्याकांडातील मोठी अपडेट; 'या' कारणामुळेच रमेश रेड्डींना संपवलं

फुरसुंगीत ऐन गर्दीच्यावेळी खुनाचा थरार

पुर्ववैमन्यासातून घडलेल्या रक्तरंजित घटनेने पुणे शहर पुन्हा हादरले असून, फुरसुंगीत ऐन गर्दीच्या वेळीच सहा जणांच्या टोळक्याने भर रस्त्यात एका तरुणाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या खूनाच्या थरारानंतर परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती. तर, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाला पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली होती. स्थानिक तरुणांमधील वादविवाद व वर्चस्वातून हा प्रकार घडला असल्याची माहिती आहे. आकाश उर्फ राणा मोहन कांबळे (वय २६) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी ओमकार प्रमोद मोरे (वय २३), अरूण अनिल यादव (वय २०), आदित्य ज्ञानेश्वर पिंपळेकर (वय २१) दत्ता वेंकट गीते (वय २०) यांना तात्काळ हालचाली करीत अटक केली आहे. त्यांच्या एका अल्पवयीन साथीदारालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आदित्य प्रकाश कांबळे याच्यासह आणखी एक आरोपी मात्र फरार झाला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra