Dailyhunt
पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दहा गुन्हेगारांना जिल्ह्यातून केले तडीपार

पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दहा गुन्हेगारांना जिल्ह्यातून केले तडीपार

पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीती पसरत आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडूनही प्रयत्न केले जात आहेत. अशातच आता पुणे पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे.

अवैध गावठी दारू विक्री करणारे तसेच जुगार खेळणे, संघटित गुन्हेगारी अशा गंभीर प्रकरणातील तब्बल १० गुन्हेगारांना शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. परिमंडळ सातचे पोलिस उपायुक्त सोमय मुंढे यांनी या तडीपारीचे आदेश दिले आहेत.

अभिजीत संजय जाधव (वय २९), साईनाथ उर्फ कडूबापु विठ्ठल पाटोळे (वय २७), अविनाश मुरलीधर मेटे (वय ३६), गगन तानाजी शिंदे (वय २४), संकेत अमोल बांदल (वय २७), मच्छिंद्र शंकर पवार (वय ३८), सचिन भिमराव मातंग (वय २५), आदित्य बापु शिंदे (वय २५), बिरा रामदास श्रीराम (वय ३८), मालती संतोष मलके (वय ४५) अशी तडीपार करण्यात आलेल्या दहा जणांची नावे आहेत.

तडीपार करण्यात आलेल्यांमधील दहा गुन्हेगारांपैकी चंदननगर पोलिस ठाण्यातील पाच गुन्हेगार आहेत. त्यानंतर लोणीकंद व वाघोली पोलिस ठाण्यातील प्रत्येकी दोन तसेच विमानतळ पोलिस ठाण्यातील एक अशा दहा जणांचा समावेश आहे. पुणे शहरातील कायदा व सुव्यव्था राखण्यासाठी पुणे पोलिसांकडून गुन्हेगारांच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहेत. यादरम्यान, जबरी चोऱ्या, गंभीर दुखापत, अवैध हातभट्टी दारू विक्री करणारे तसेच जुगार आणि संघटित गुन्हेगारी करणाऱ्या या दहा जणांना पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांनी शहर व जिल्ह्यातून तडीपारीचे आदेश दिले आहेत.

हे सुद्धा वाचा : ग्रामीण रुग्णालयाचा मार्ग अखेर मोकळा, ओतूरकरांच्या लढ्याला यश; 'या' तारखेला होणार उद्घाटन

शंभर गुन्हेगारांना केले हद्दपार

परिमंडळ सातमधील लोणीकंद, वाघोली, खराडी, चंदननगर, लोहगाव, विमानतळ तसेच येरवडा पोलिस ठाण्यातील एकूण तब्बल १०० गुन्हेगारांना आतापर्यंत तडीपार करण्यात आले आहे. दरम्यान, तडीपार केलेले गुन्हेगार जिल्हा किंवा शहरात दिसून आल्यानंतर तत्काळ पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला

निगडी येथील पीसीएमसी कॉलनीतील सार्वजनिक शौचालयाजवळ जुन्या भांडणाच्या रागातून एका तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी आलेल्या मित्रावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (११ एप्रिल) रोजी पहाटे ४:५० च्या सुमारास ही घटना घडली आहे. विवेक ऊर्फ विकी विनोद सोनकांबळे (वय १९, अण्णाभाऊ साठे नगर, निगडी), जुबेर नासीर शेख (वय ३०), श्रवण ऊर्फ सुरज शाहजी कुऱ्हाडे (वय २० दोघेही रा. पीसीएमसी वसाहत, निगडी) आणि त्यांच्या एका साथीदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी विवेक सोनकांबळे आणि जुबेर शेख या दोघांना अटक केली आहे. प्रसाद नंदकुमार बहुले (३०, अण्णाभाऊ साठे नगर, निगडी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra