Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'राऊतांना उद्धव ठाकरेंनी इतकं झापलं की, फक्त मारायचं बाकी होतं'; बच्चू कडू यांचा खळबळजनक दावा

'राऊतांना उद्धव ठाकरेंनी इतकं झापलं की, फक्त मारायचं बाकी होतं'; बच्चू कडू यांचा खळबळजनक दावा

मुंबई : ठाकरे गटातील सलग घडामोडींमुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. सहा खासदारांच्या पक्षांतरानंतर आता माजी मंत्री सचिन अहिर यांनीही उद्धव ठाकरेयांची साथ सोडत एकनाथ शिंदेयांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

या पार्श्वभूमीवर सत्ताधारी नेत्यांकडून ठाकरे गटावर टीकेची झोड उठवली जात असून, प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडूयांनी थेट संजय राऊतयांच्यावर निशाणा साधला आहे.

सचिन अहिर यांच्या प्रवेशानंतर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू म्हणाले, “आता सचिन अहिर आमच्याकडे आले आहेत, तर त्यांची टीमही येईल. आम्ही त्यांचे मित्र म्हणून स्वागत करू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातून केंद्र सरकारला बळकटी देण्याचं काम केलं आहे.”

यानंतर त्यांनी संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप करत खळबळजनक दावा केला. “संजय राऊत यांच्या बेताल विधानांमुळे पक्षात मोठी नाराजी आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांना इतकं झापलं की, फक्त मारायचं बाकी राहिलं होतं,” असा दावा बच्चू कडू यांनी केला. मात्र, या दाव्याला कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

'तुमच्या पक्षात असतील तर वाघ, दुसरीकडे गेले की वेश्या?'; राज ठाकरेंच्या टीकेला संजय शिरसाट यांचा पलटवार

राज ठाकरे यांच्या टीकेवर सावध भूमिका

राज ठाकरे यांनी भाजपवर केलेल्या टीकेबाबत विचारले असता बच्चू कडू यांनी सावध प्रतिक्रिया दिली. “हा विषय दिल्लीचा आहे. त्याबाबतचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील,” असे ते म्हणाले.

मंत्रीपदाच्या चर्चेबाबत ते म्हणाले, “आमच्या वाट्याला मंत्रीपद आलं म्हणजे महाराष्ट्राच्या वाट्यालाच आलं. आमच्यात कोणतीही नाराजी नाही. पक्ष अधिक मजबूत करणं हाच आमचा अजेंडा आहे.”

पूरग्रस्त आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सूचना

राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवरही बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. “निसर्ग कोपला की शिवसैनिकांनी मदतीला धावून जायला हवं, अशा सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. आम्ही त्या सूचनांचं पालन करू. संकटाच्या काळात आम्ही जनतेसोबत आणि शेतकऱ्यांसोबत ठामपणे उभे आहोत,” असे त्यांनी सांगितले.

Sanjay Raut vs BJP: 'ED आणि CBI आमच्या ताब्यात द्या, १० मिनिटांत भाजपचे १० तुकडे करू" संजय राऊतांचे थेट आव्हान

TET पेपरफुटीवर कठोर कारवाईची मागणी

टीईटी परीक्षा पेपरफुटी प्रकरणावर बोलताना बच्चू कडू यांनी कठोर शिक्षेची मागणी केली. “पेपरफुटी करणाऱ्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे. तसेच सैन्य भरतीप्रमाणे महत्त्वाच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा विचार व्हायला हवा. ६ जुलैपूर्वी याबाबत निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे,” असे त्यांनी म्हटले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra