Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
संशयास्पद महिलेला पकडले, चिमुरड्याच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला; दुपारी नेमकं काय घडलं?

संशयास्पद महिलेला पकडले, चिमुरड्याच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला; दुपारी नेमकं काय घडलं?

​पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून मुले पळवणारी टोळी सक्रिय असल्याच्या अफवांना ऊत आला असतानाच, काळभोरनगर परिसरात सोमवारी दुपारी एका संशयास्पद महिलेने एका बालकाला जवळ बोलावून पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मात्र, संबंधित मुलाने प्रसंगावधान दाखवत तिथून धूम ठोकल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, पालकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.


सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास काळभोरनगर परिसरात एक अनोळखी महिला बराच वेळ घुटमळत होती. परिसरात खेळत असलेल्या एका लहान मुलावर तिची नजर पडली. तिने त्याला खुणावून जवळ बोलावले आणि त्याच्याशी संवाद साधण्यास सुरुवात केली. मात्र, त्या महिलेच्या हालचाली आणि बोलण्यावरून त्या चिमुरड्याला धोक्याची जाणीव झाली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्याने क्षणाचाही विलंब न लावता तेथून पळ काढला आणि थेट घर गाठून पालकांना हकीकत सांगितली.

​नागरिकांचा संताप आणि पोलिसांची एन्ट्री

मुलाने सांगितलेला प्रकार ऐकून घाबरलेल्या पालकांनी तत्काळ बाहेर धाव घेतली. ती महिला अद्याप तिथेच उभी असल्याचे पाहून नागरिकांनी आरडाओरडा केला. बघता बघता तिथे मोठी गर्दी जमा झाली आणि वातावरण तणावपूर्ण बनले. जमावाने महिलेला घेराव घातला असता तातडीने पोलिसांना पाचारण करण्यात आले. पिंपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित महिलेला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले.

पोलिसी खाक्या दाखवताच या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. सुरुवातीला त्या महिलेने 'आर्थिक अडचणीमुळे मुलाला पळवण्याचा विचार केला होता', अशी कबुली दिली. ही महिला मोहननगर परिसरातील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी तिच्या पतीला बोलावून विचारपूस केली असता, पतीने दावा केला की, "संबंधित महिलेची मानसिक स्थिती ठीक नाही, तिच्यावर उपचार सुरू आहेत." त्यामुळे ही घटना केवळ मानसिक आजारातून घडली की त्यामागे काही मोठे रॅकेट आहे, याबाबत पोलीस आता अधिक तपास करत आहेत.

या घटनेमुळे काळभोरनगरसह संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असले, तरी पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष द्यावे आणि अनोळखी व्यक्तींपासून सावध राहावे, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.

हे सुद्धा वाचा : संभाजीनगरमध्ये बनावट खत रॅकेटचा पर्दाफाश; २६ लाखांचा साठा जप्त, नामांकित कंपन्यांच्या नावाखाली फसवणूक

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra