- सावधान! तुमची हायटेक कार चोरीला जाऊ शकते
- सुरक्षेसाठी चावीला ॲल्युमिनियम फॉइलमध्ये लपेटणे का आहे गरजेचे?
Aluminum Foil For Car Keys: आधुनिक तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन सुखकर झाले असले तरी, त्यासोबतच नवनवीन धोकेही समोर येत आहेत.
सध्या कार चोरीच्या पद्धती पूर्वीपेक्षा अत्यंत हायटेक आणि ‘स्मार्ट’ झाल्या आहेत. पूर्वी चोर कडी-कोयंडा किंवा काच फोडून गाडी चोरायचे, मात्र आता कोणत्याही खुणा न ठेवता क्षणार्धात कार गायब केली जात आहे. जागतिक स्तरावर कार चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, यापासून वाचण्यासाठी कार मालक आता चक्क ॲल्युमिनियम फॉइल (Aluminium Foil) सारख्या घरगुती वस्तूचा वापर करत आहेत. ही ट्रिक दिसायला जरी विचित्र असली, तरी ती अत्यंत परिणामकारक मानली जात आहे.
‘की-लेस’ एन्ट्री सिस्टम: सोय की डोकेदुखी?
आजकल बहुतांश नवीन आणि महागड्या गाड्यांमध्ये ‘की-लेस’ (Keyless Entry) सिस्टम दिली जाते. यामध्ये चावी खिशात असतानाच कारचा दरवाजा आपोआप उघडतो. ही यंत्रणा कार आणि ‘की-फॉब’ यांच्यातील वायरलेस सिग्नलद्वारे काम करते. मात्र, हीच सुविधा आता चोरट्यांसाठी मोठी संधी ठरत आहे. चोरटे या वायरलेस सिग्नलमध्ये हस्तक्षेप करून कारचे लॉक सहजपणे उघडत आहेत.
काय आहे ‘रिले अटॅक’?
सध्या कार चोरीसाठी ‘रिले अटॅक’ या तंत्राचा सर्वाधिक वापर केला जात आहे. यामध्ये साधारणतः दोन चोरटे मिळून काम करतात. एक चोरटा कारच्या जवळ उभा राहतो, तर दुसरा घराच्या दरवाजाजवळ किंवा खिडकीपाशी जातो जिथे कारची चावी ठेवलेली असते. एका विशेष इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या साहाय्याने ते चावीचा सिग्नल पकडतात (Boost) आणि तो कारपर्यंत पोहोचवतात. कारला वाटते की चावी जवळच आहे आणि ती त्वरित अनलॉक होते. धक्कादायक बाब म्हणजे, चोरटे घराच्या आत असलेल्या चावीचा सिग्नलही बाहेरून खेचू शकतात.
Car Safety Tips : नवी कार खरेदी केली? मग 'या' ५ ॲक्सेसरीज आहेत सर्वात महत्त्वाच्या
संशोधनातून समोर आलेले वास्तव
विविध मीडिया रिपोर्ट्स आणि तांत्रिक संशोधनानुसार, हे वायरलेस सिग्नल अनेक फुटांपर्यंत प्रवास करू शकतात. विशेषतः जर तुमची चावी घराच्या मुख्य दरवाजाच्या मागे किंवा खिडकीजवळ असेल, तर चोरटे ‘लाईन ऑफ साईट’ नसतानाही हा सिग्नल पकडू शकतात. याचा अर्थ तुमची चावी घराच्या आत सुरक्षित असली, तरी तुमची कार बाहेर सुरक्षित नाही.
ॲल्युमिनियम फॉइलची ‘स्मार्ट’ ट्रिक
या तांत्रिक चोरीपासून वाचण्यासाठी अनेक तज्ज्ञ आता ॲल्युमिनियम फॉइलचा वापर करण्याचा सल्ला देत आहेत. जेव्हा तुम्ही कारची चावी ॲल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळता, तेव्हा ते एक प्रकारचे शील्ड म्हणून काम करते. हे फॉइल चावीतून निघणारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिग्नल ब्लॉक करते, ज्यामुळे चोरट्यांचे डिव्हाइस हे सिग्नल पकडू शकत नाही.
गाडी सुरक्षित ठेवण्यासाठी तज्ज्ञांच्या टिप्स:
- ॲल्युमिनियम फॉइल: घरी असताना चावी फॉइलमध्ये गुंडाळून ठेवा.
- फॅराडे पाऊच (Faraday Pouch): तुम्ही बाजारात मिळणाऱ्या विशेष ‘फॅराडे पाऊच’चा वापर करू शकता, जे सिग्नल ब्लॉक करण्यासाठीच बनवलेले असतात.
- चावीची जागा बदला: कारची चावी कधीही घराच्या मुख्य दरवाजाजवळ किंवा खिडकीपाशी ठेवू नका. ती घराच्या मध्यभागी किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवा.
- सॉफ्टवेअर अपडेट: आपल्या कारची सिक्युरिटी सिस्टीम नेहमी अपडेट ठेवा.
तुमची सतर्कता आणि हे छोटेसे बदल तुमच्या लाखो रुपयांच्या कारला चोरीपासून वाचवू शकतात.
खर्च कमी आणि परफॉर्मन्स भारी! Force Motors ची नवीन 'ट्रॅव्हलर एन' श्रेणी लाँच

