Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
शासकीय कामात अडथळा, मद्यधुंद तरुणाची पोलिसांना धक्काबुक्की; नेमकं काय घडलं?

शासकीय कामात अडथळा, मद्यधुंद तरुणाची पोलिसांना धक्काबुक्की; नेमकं काय घडलं?

नाशिक : कॉलेज रोडवरील डिसुझा कॉलनी परिसरात सोमवारी (दि. ३) पहाटे अडीच वाजेच्या सुमारास एका मद्यधुंद तरुणाने जोरदार राडा केला आहे. रस्त्यावर आरडाओरडा करणाऱ्या या तरुणाला शांत राहण्याचा सल्ला दिला असता, त्याने थेट गस्तीवर असलेल्या पोलिसांशीच अरेरावी करत त्यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी संशयित तरुणाविरुद्ध गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. रोहित विनायक आढाव (२८, रा. आढाव मळा, गुरुदत्तनगर, जेलरोड, नाशिक) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्याचे अंमलदार घनश्याम प्रकाश भोये यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोये व त्यांचे सहकारी सोमवारी पहाटेच्या सुमारास ‘डीबी मोबाईल’ पथकासह परिसरात गस्त घालत होते. पहाटे अडीच वाजेच्या सुमारास डिसूझा कॉलनीतील एका आलिशान दारू दुकानाबाहेर गर्दी दिसल्याने पोलिसांनी वाहन थांबवले. त्या ठिकाणी संशयित रोहित आढाव दारूच्या नशेत मोठ्याने आरडाओरड करत शांतता भंग करत होता. पोलिसांनी त्याला रस्त्यावरून बाजूला होण्यास सांगितले, मात्र त्याने पोलिसांचे न ऐकता हुज्जत घालण्यास सुरुवात केली. मी पोलिसांना घाबरत नाही, माझे कोणी काही वाकडे करू शकत नाही, असे ओरडत त्याने पोलिसांना शिवीगाळ केली व कायदा-सुव्यवस्थेचा फज्जा उडवला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन शासकीय वाहनात बसवण्याचा प्रयत्न केला असता, त्याने पोलिसांना धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. शेवटी पोलिसांनी बळाचा वापर करून त्याला ताब्यात घेतले आणि जिल्हा शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी दाखल केले.

हे सुद्धा वाचा : आली लहर केला कहर! 112 हेल्पलाईनवर खून झाल्याची माहिती; यंत्रणेला दमवणारा 'तो' कॉलर रडारवर

डिसूझा कॉलनी परिसरातील बार, वाईट शॉप, कॅफे आणि रेस्टॉरंट्समध्ये रात्री उशिरापर्यंत तरुणाईच्या पार्ट्या सुरू असतात. या आस्थापनांबाहेर होणारी बेशिस्त पार्किंग आणि मद्यधुंद टोळक्यांमधील वाद ही आता रोजचीच बाब झाली आहे. यापूर्वीही पोलिसांनी येथे कारवाया केल्या आहेत, मात्र तरीही रात्रीच्या वेळी हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पूर्णपणे अंकुश लागलेला नाही. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या गल्लीत नियमित गस्त वाढवून ‘सरप्राइज चेकिंग’ करावी आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra