भारतामध्ये शेती आणि ट्रॅक्टर यांचं एक अतुट नातं आहे. शेतातील नांगरणीपासून ते बाजारात शेतीमाल नेण्यापर्यंत ट्रॅक्टर हा शेतकऱ्याचा खरा सोबती असतो. पण, जेव्हा हाच ट्रॅक्टर शेतातून निघून डांबरी रस्त्यावर किंवा हायवेवर येतो, तेव्हा आरटीओचे नियम काय सांगतात?
ट्रॅक्टर चालवण्यासाठी साधं लायसन्स चालतं की ट्रान्सपोर्ट लायसन्स लागतं? अनेक शेतकऱ्यांच्या मनात याबद्दल संभ्रम असतो. चला तर मग, यातील कायदेशीर फरक सोप्या भाषेत समजून घेऊया,
१. शेतात ट्रॅक्टर चालवणे: नियम काय सांगतो?
कायद्यानुसार, जर तुम्ही ट्रॅक्टर फक्त तुमच्या स्वतःच्या खाजगी शेतजमिनीत चालवत असाल, तर तिथे ट्रॅफिकचे नियम लागू होत नाहीत. शेतात ट्रॅक्टर चालवताना कोणतीही पोलीस कारवाई किंवा आरटीओची तपासणी होत नाही. पण, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि अपघात टाळण्यासाठी ट्रॅक्टर चालवणाऱ्या व्यक्तीला गाडी चालवण्याचा अनुभव आणि मूलभूत ज्ञान असणे अत्यंत गरजेचे आहे.
RC बुकवरील 'इंजिन नंबर' आणि 'चेसिस नंबर' का महत्त्वाचे आहेत? सविस्तरपाने जाणून घ्या
२. हायवेवर ट्रॅक्टर आणणे: ‘साधं’ लायसन्स की ‘ट्रान्सपोर्ट’?
सगळ्यात महत्त्वाचा आणि गुंतागुंतीचा प्रश्न म्हणजे रस्त्यावर ट्रॅक्टर आणताना कोणते लायसन्स हवे? याचे उत्तर ट्रॅक्टरच्या वापरावरून ठरते,
- साधं लायसन्स (नॉन-कमर्शियल): जर तुमचा ट्रॅक्टर ‘शेती कामासाठी’ नोंदणीकृत असेल आणि तुम्ही त्याचा वापर स्वतःच्या शेतातील माल, खते किंवा बी-बियाणांची वाहतूक करण्यासाठी करत असाल, तर तुम्हाला LMV (Light Motor Vehicle) किंवा ट्रॅक्टरसाठीचे विशेष साधं लायसन्स पुरेसे असते. यासाठी ट्रॅक्टरला पांढरी नंबर प्लेट असणे आवश्यक आहे.
- ट्रान्सपोर्ट लायसन्स (कमर्शियल): जर तुम्ही ट्रॅक्टरचा वापर व्यावसायिक कामासाठी करत असाल, जसे की वीटभट्टीवरील विटा वाहणे, वाळू-दगड वाहतूक करणे, किंवा इतरांचे बांधकाम साहित्य भाड्याने वाहून नेणे, तर तो ट्रॅक्टर ‘कमर्शियल’ मानला जातो. अशा वेळी चालकाकडे ‘ट्रान्सपोर्ट’ किंवा ‘कमर्शियल’ ड्रायव्हिंग लायसन्स असणे सक्तीचे आहे. या ट्रॅक्टरची नंबर प्लेट ही पिवळ्या रंगाची असते.
३. कायदेशीर फरक आणि दंड
अनेकदा शेतीच्या नावावर नोंदणी असलेला ट्रॅक्टर व्यावसायिक कामासाठी वापरला जातो. ट्रॅफिक पोलिसांनी किंवा आरटीओने जर शेतीच्या ट्रॅक्टरमध्ये व्यावसायिक मालाची वाहतूक करताना पकडले, तर मोठा दंड होऊ शकतो. विना-लायसन्स किंवा चुकीच्या लायसन्सवर ट्रॅक्टर चालवल्यास इन्शुरन्स क्लेम देखील नाकारला जाऊ शकतो.
थोडक्यात सांगायचं तर, स्वतःच्या शेतीसाठी साधं लायसन्स चालतं, पण व्यावसायिक भाडेतत्वावर काम करायचे असल्यास ‘कमर्शियल’ लायसन्स आणि पिवळी नंबर प्लेट असणे कायद्याने बंधनकारक आहे.
