Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
St Bus News : एसटीतील जुने ट्रॉली जॅक ठरतायत 'मृत्यूचा सापळा'; चार कर्मचाऱ्यांचा बळी, नवीन उपकरणांची मागणी

St Bus News : एसटीतील जुने ट्रॉली जॅक ठरतायत 'मृत्यूचा सापळा'; चार कर्मचाऱ्यांचा बळी, नवीन उपकरणांची मागणी

  • एसटीत मृत्यूचा सापळा ठरत आहेत जुने ट्रॉली जॅक
  • जॅक सटकून आतापर्यंत चार यांत्रिकी कर्मचाऱ्यांचा मृत्यू, अनेक कर्मचारी जखमी
  • नवीन ट्रॉली जॅक तातडीने खरेदी करण्याची श्रीरंग बरगे यांची मागणी
मुंबई :एसटी महामंडळातील बसांच्या दैनंदिन देखभाल आणि दुरुस्तीमध्ये वापरले जाणारे ट्रॉली जॅक हे अत्यंत महत्त्वाचे उपकरण असले, तरी अनेक वर्षांपासून नवीन जॅकची खरेदी न झाल्याने यांत्रिकी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जुने आणि निकामी ट्रॉली जॅक वापरताना वारंवार अपघात होत असून आतापर्यंत चार यांत्रिकी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचा दावा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.

राज्यभरात एसटी महामंडळात सुमारे १५ हजार २०० यांत्रिकी कर्मचारी कार्यरत असून बसांची दैनंदिन देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी त्यांच्यावर आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांत नवीन ट्रॉली जॅक खरेदी करण्यात आलेले नाहीत. सततच्या वापरामुळे बहुतांश जॅक जीर्ण व निकामी झाले असून ते कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण करत आहेत.

तीर्थयात्रा होणार अधिक सुलभ! 'एसटी संगे तीर्थाटन' योजनेत खासगी पर्यटन संस्थांना हिरवा कंदील; भाविकांना मिळणार वन-स्टॉप सुविधा

पूर्वीच्या एसटी बसचे वजन तुलनेने कमी होते. मात्र, सध्या महामंडळाच्या ताफ्यात अधिक वजनाच्या आधुनिक बसांचा समावेश झाल्याने जुन्या ट्रॉली जॅकवर अतिरिक्त ताण येत आहे. त्यामुळे दुरुस्तीचे काम सुरू असताना जॅक सटकण्याच्या घटना वाढल्या असून अनेक कर्मचारी जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर यांत्रिकी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

सध्या राज्यभरात किमान ३५० ट्रॉली जॅकची आवश्यकता असताना एसटीकडे केवळ सुमारे ४० ट्रॉली जॅक (२० टन क्षमतेचे) उपलब्ध आहेत. याशिवाय सुमारे चार हजार बॉटल-टाइप जॅक वापरात आहेत. मात्र, वाढत्या ब्रेकडाऊनच्या घटना, जुन्या बसांची संख्या आणि देखभाल-दुरुस्तीवरील वाढता ताण लक्षात घेता उपलब्ध उपकरणे अपुरी पडत असल्याचे कर्मचारी संघटनेचे म्हणणे आहे.

महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी मृत्यूचा सापळा ठरत असलेले जुने ट्रॉली जॅक तातडीने भंगारात काढावेत आणि अत्याधुनिक क्षमतेचे नवीन ट्रॉली जॅक तसेच बॉटल-टाइप जॅक खरेदी करावेत, अशी मागणी केली आहे. तसेच यांत्रिकी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून अपघात टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशीही त्यांनी एसटी प्रशासनाकडे मागणी केली आहे.

Pratap Sarnaik : भाडेवाढीनंतरही एसटी तोट्यात; 'महिनाभरात उत्पन्न वाढवा, अन्यथा…', प्रताप सरनाईक यांचा एक महिन्याचा अल्टिमेटम

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra