Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; अट्टल घरफोड्या आरोपी जेरबंद, ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; अट्टल घरफोड्या आरोपी जेरबंद, ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोड्यांचे गुन्हे करणाऱ्या अट्टल आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने अटक करून त्याच्याकडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम तसेच वाहने असा तब्बल ४५ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

३० मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद पवार यांना गोपनीय माहिती मिळाली की, अट्टल घरफोड्या आरोपी अजय श्रावण शिंदे हा सुंभा परिसरात आला आहे. या माहितीची तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना देण्यात आली. पोलीस अधीक्षक रितू खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आरोपीचा शोध सुरू केला.

दरम्यान, पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला तसेच श्रावण जमनाशा शिंदे यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान सुरुवातीला आरोपींकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. मात्र अधिक विश्वासात घेऊन केलेल्या चौकशीत अजय शिंदे याने जिल्ह्यातील बेंबळी, ढोकी, धाराशिव ग्रामीण, शिराढोण, मुरूम, लोहारा, वाशी, परंडा, येरमाळा आणि आनंदनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण ३२ घरफोड्यांचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने केल्याची कबुली दिली.

चोरीच्या मालामधून त्याच्या वाट्याला आलेले सुमारे १८ तोळे सोने पोलिसांनी जप्त केले. तसेच चोरीचे काही सोने विकून मिळालेल्या पैशांतून आरोपीने एक ब्रेझा चारचाकी वाहन आणि एक नवीन बुलेट दुचाकी खरेदी केल्याचेही तपासात निष्पन्न झाले. या सर्व मालासह एकूण ४५.३५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे तसेच शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra