Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! जिजामाता उद्यानाच्या धर्तीवर ठाण्यात साकारणार आधुनिक प्राणी संग्रहालय

ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! जिजामाता उद्यानाच्या धर्तीवर ठाण्यात साकारणार आधुनिक प्राणी संग्रहालय

  • जिजामाता उद्यानाच्या धर्तीवर ठाण्यात साकारणार आधुनिक प्राणी संग्रहालय
  • जिजामाता उद्यानाप्रमाणे ठाणेकरांनाही मिळणार विरंगुळा
  • ठाणेकरांना निसर्गाच्या सान्निध्यात विरंगुळ्यासाठी नवे ‘ग्रीन डेस्टिनेशन’ उपलब्ध होणार

मुंबईतील प्रसिद्ध जिजामाता भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयाच्या धर्तीवर ठाणेशहरातही निसर्ग, जैवविविधता, पर्यावरण संवर्धन आणि पर्यटनाचा अनोखा संगम घडविणारे अत्याधुनिक वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालय विकसित करण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील आरक्षण क्र. ४, मौजे चितळसर-मानपाडा (टिकुजिनी वाडी) येथील सुमारे १० हेक्टर जागेवर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यातील महानगरपालिकांमध्ये मूलभूत सोयी-सुविधांचा विकास करण्यासाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून अनुदान दिले जाते. त्याअंतर्गत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार ठाणे शहरातील विविध विकासकामांसाठी शासनाने मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर केला असून, त्यामध्ये या वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयाच्या विकासाचाही समावेश करण्यात आला आहे.

जिजामाता उद्यानाप्रमाणे ठाणेकरांनाही मिळणार विरंगुळा

वेगाने विस्तारत असलेल्या ठाणे शहराला केवळ रस्ते, पूल आणि इमारतींचीच नव्हे, तर नागरिकांच्या जीवनमानात भर घालणाऱ्या पर्यावरणपूरक प्रकल्पांचीही आवश्यकता आहे. मुंबईतील जिजामाता भोसले उद्यानाप्रमाणे ठाणेकरांना निसर्गाच्या सान्निध्यात विरंगुळा मिळावा, मुलांना जैवविविधतेची ओळख व्हावी आणि पर्यावरण संवर्धनाचे संस्कार नव्या पिढीमध्ये रुजावेत, या संकल्पनेतून हा प्रकल्प उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

या प्रकल्पामध्ये विविध दुर्मीळ आणि स्थानिक वनस्पतींचे संवर्धन, प्राण्यांसाठी आधुनिक अधिवास, पर्यावरणविषयक माहिती केंद्र तसेच नागरिकांसाठी फिरण्याची आणि विश्रांतीची सुविधा विकसित केली जाण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनासोबतच पर्यटनालाही मोठी चालना मिळणार आहे.

Marathi Language: मराठी सक्तीवर राजकारण सुरू; पण मीरा-भाईंदरातील रिक्षाचालकांनी दाखवली भाषेप्रती सकारात्मक भूमिका

ठाणे शहराला एक नवे ‘ग्रीन डेस्टिनेशन’ मिळणार

चितळसर-मानपाडा परिसरातील सर्वे क्रमांक ५१/अ/१/१ येथील जागेवर प्रस्तावित या प्रकल्पामुळे ठाणे शहराला एक नवे ‘ग्रीन डेस्टिनेशन’ मिळणार आहे. विविध प्रजातींच्या वनस्पतींचे संवर्धन, पर्यावरणविषयक जनजागृती, जैवविविधतेचे दर्शन आणि नागरिकांसाठी दर्जेदार विरंगुळ्याची सुविधा या माध्यमातून उपलब्ध करण्याचा मानस आहे. राज्य शासनाच्या २० जुलै रोजीच्या शासन शुद्धीपत्रकानुसार ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कामांसाठी एकूण १५० कोटींची मंजूर रक्कम नमूद करण्यात आली असून, त्यामध्ये या प्रकल्पासाठी सुरुवातीला १० कोटींची तरतूद दर्शविण्यात आली आहे.

Shravan 2026: 'हर हर महादेव'च्या जयघोषात रंगणार श्रावणोत्सव; ठाण्यातील शिवमंदिरामध्ये जय्यत तयारी

पर्यावरण संवर्धनाला मिळणार चालना

या प्रकल्पाचा मुख्य उद्देश केवळ प्राणी संग्रहालय उभारणे नसून विविध वनस्पतींचे संवर्धन, जैवविविधतेचे जतन आणि पर्यावरणाविषयी जनजागृती करणे हा आहे. विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना निसर्गाबद्दल प्रत्यक्ष माहिती मिळावी तसेच पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व समजावे, यासाठी येथे विविध उपक्रमही राबवले जाणार आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra