Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Trump Buffalo: सोशल मीडियाच्या ताकदीने वाचला 700 किलोच्या 'डोनाल्ड ट्रम्प'चा जीव; बांगलादेश सरकारने खरेदीदाराचे पैसे का केले परत?

Trump Buffalo: सोशल मीडियाच्या ताकदीने वाचला 700 किलोच्या 'डोनाल्ड ट्रम्प'चा जीव; बांगलादेश सरकारने खरेदीदाराचे पैसे का केले परत?

  • ‘डोनाल्ड ट्रम्प’चा जीव वाचला
  • सरकारचा थेट हस्तक्षेप
  • प्राणीसंग्रहालयात नवीन घर

Donald Trump Buffalo Bangladesh News 2026 : काही प्राण्यांचे नशीब इतके अजब असते की त्यांच्यावर थेट देशाच्या सरकारला निर्णय घ्यावा लागतो.

सध्या शेजारील देश बांगलादेशातून अशीच एक थक्क करणारी आणि अत्यंत रंजक घटना समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था ‘रॉयटर्स’च्या अहवालानुसार, बांगलादेशात सध्या एका म्हशीने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. या म्हशीचे नाव चक्क अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांवरून ‘डोनाल्ड ट्रम्प’ (Donald Trump) ठेवण्यात आले आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, यंदाच्या बकरीदच्या (ईद-उल-अझहा) पवित्र सणा निमित्त या म्हशीचा बळी दिला जाणार होता. तिची विक्रीही झाली होती. मात्र, ऐन वेळी बांगलादेशच्या गृह मंत्रालयाने थेट हस्तक्षेप करत या म्हशीचा बळी देण्यास बंदी घातली आणि तिचा जीव वाचवला.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी काय आहे कनेक्शन?

सहसा आपण काळ्या किंवा गडद रंगाच्या म्हशी पाहतो. मात्र, ही म्हैस निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार आहे. ही एक अत्यंत दुर्मिळ ‘अल्बिनो’ (Albino Buffalo) जातीची म्हैस आहे, जिचा रंग पूर्णपणे पांढरा-गुलाबी असून तिच्या डोक्यावर आणि अंगावर सोनेरी केसांचे झुबके आहेत. या म्हशीचे मालक झियाउद्दीन मृधा यांनी सांगितले की, तिच्या डोक्यावरील सोनेरी केशरचना आणि चेहऱ्याची ठेवण हुबेहूब अमेरिकेचे नेते डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखी दिसते. त्यामुळेच त्यांच्या धाकट्या भावाने गमतीने या ७०० किलो (सुमारे १५४३ पाउंड) वजनाच्या जनावराचे नाव ‘डोनाल्ड ट्रम्प’ असे ठेवले होते. हा प्राणी स्वभावाने अत्यंत शांत असून त्याला नियमित आंघोळ घालणे आणि विशेष खाऊ पिऊ घालण्याची काळजी फार्मवर घेतली जात असे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Venezuela Energy: व्हेनेझुएलाच्या खजिन्याची चावी आता ट्रम्प यांच्या हातात; 1 कोटी बॅरल तेल पोहोचले अमेरिकेत, वाचा कारण काय?

व्हिडिओ व्हायरल झाला अन् फार्मवर उसळला जनसागर!

बकरीदच्या बाजारात कुर्बानीसाठी (बळी देण्यासाठी) जेव्हा या म्हशीला आणले गेले, तेव्हा तिच्या अनोख्या रंगाने आणि ‘डोनाल्ड ट्रम्प’ या नावाने सर्वांचे लक्ष वेधले. काही लोकांनी याचे व्हिडिओ बनवून टिकटॉक आणि फेसबुकवर अपलोड केले. अवघ्या काही तासांत हे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. यानंतर या ‘डोनाल्ड ट्रम्प’ म्हशीला प्रत्यक्ष पाहण्यासाठी बांगलादेशच्या कानाकोपऱ्यातून हजारो लोकांची गर्दी त्या फार्मवर आणि बाजारात जमा झाली. परिस्थिती इतकी नियंत्रणाबाहेर गेली की तेथे कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला. लोकांनी या म्हशीची एक झलक पाहण्यासाठी मोठी झुंबड उडवली होती.

गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय; खरेदीदाराचे पैसे केले परत

लोकांची वाढती उत्सुकता, सुरक्षेची चिंता आणि या दुर्मिळ प्राण्याबद्दल वाटणारे कुतूहल लक्षात घेऊन बांगलादेशचे गृहमंत्री सलाहुद्दीन अहमद यांनी तातडीने पावले उचलली. गृह मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारने या म्हशीची कुर्बानी देण्यावर तात्काळ बंदी घातली. ज्या खरेदीदाराने ही म्हैस लाखो रुपये देऊन खरेदी केली होती, त्याला सरकारने स्वतःचे पैसे देऊन ती म्हैस ताब्यात घेतली आणि खरेदीदाराची रक्कम पूर्णपणे परत केली. गृहमंत्र्यांनी दिलेल्या विशेष निर्देशानुसार, या ‘डोनाल्ड ट्रम्प’ म्हशीला आता राजधानी ढाका येथील राष्ट्रीय प्राणीसंग्रहालयात (National Zoo) अधिकृतपणे पाठवले जात आहे, जिथे ती कायमची सुरक्षित राहील.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Iran Deal: इराणचा 'हा' एकच निर्णय भारतासह 8 देशांसाठी धक्कादायक! 11 लाख कोटींच्या खजिन्यासाठी अट; जागतिक बँकिंग क्षेत्रात खळबळ

दुर्मिळतेमुळे वाचला ‘डोनाल्ड ट्रम्प’चा जीव

बांगलादेश आणि दक्षिण आशियाई देशांमध्ये अल्बिनो म्हशी अत्यंत दुर्मिळ मानल्या जातात. जनुकीय बदलांमुळे (Genetic Mutation) या प्राण्यांचा रंग असा पांढरा किंवा सोनेरी होतो. बकरीदच्या बाजारात अशा प्राण्यांना खूप मोठी मागणी असते आणि त्यांचे दरही गगनाला भिडलेले असतात. मात्र, या म्हशीच्या बाबतीत तिच्या अनोख्या सोनेरी केसांनी आणि ‘डोनाल्ड ट्रम्प’ या नावाने तिचे नशीब पूर्णपणे बदलून टाकले. एका सामान्य कुर्बानीच्या जनावरावरून ही म्हैस आता बांगलादेशची ‘नॅशनल सेलिब्रिटी’ बनली आहे. सोशल मीडियाची ताकद आणि सरकारच्या समयसूचकतेमुळे एका निष्पाप आणि दुर्मिळ प्राण्याला जीवनदान मिळाले, हीच सध्या सोशल मीडियावर कौतुकाची बाब ठरत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra