Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Umbraj News: उंब्रज ग्रामपंचायतीच्या कचरा डेपोविरोधात मनसे आक्रमक, तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांकडे तातडीच्या कारवाईची मागणी

Umbraj News: उंब्रज ग्रामपंचायतीच्या कचरा डेपोविरोधात मनसे आक्रमक, तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांकडे तातडीच्या कारवाईची मागणी

  • उंब्रज ग्रामपंचायतीच्या कचरा डेपोविरोधात मनसे आक्रमक
  • तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांकडे तातडीच्या कारवाईची मागणी
  • वाचा सविस्तर बातमी!
उंब्रज: उंब्रज येथील शासकीय विश्रामगृह (रेस्ट हाऊस) शेजारील मोरया गणेश मंडळ परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतीकडून घनकचरा टाकून तो उघड्यावर जाळला जात असल्याचा गंभीर आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रशासनाकडे धाव घेतली आहे.
या प्रकरणी तहसीलदार, कराड तसेच गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, लोकवस्तीच्या मागील बाजूस तसेच राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या काही मीटर अंतरावर गावातील संपूर्ण घनकचरा टाकला जात असून तो दररोज जाळला जात आहे. त्यामुळे निर्माण होणारा विषारी धूर परिसरातील घरांमध्ये शिरत असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दम्याच्या रुग्णांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. नागरिकांना श्वसनाचा त्रास, खोकला, डोकेदुखी, डोळ्यांची जळजळ व त्वचारोगांचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याशिवाय सदर कचरा डेपो राष्ट्रीय महामार्ग आणि नदीसारख्या स्थानिक जलस्रोतांच्या अत्यंत जवळ असल्याने पर्यावरण व पाण्याचे प्रदूषण वाढत असल्याचीही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या दहा वर्षांपासून नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे वारंवार लेखी तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

उंब्रजमध्ये स्मार्ट मीटरविरोधात शिवसेना व वीज ग्राहक आक्रमक; बसवलेले स्मार्ट मीटर तात्काळ काढा; अन्यथा १५ ऑगस्टनंतर तीव्र आंदोलन

मनसेने प्रशासनाकडे घनकचरा व्यवस्थापनासाठी लोकवस्तीपासून दूर पर्यावरणपूरक जागा तातडीने निश्चित करावी, सध्याचा कचरा त्वरित हटवून जागेचे निर्जंतुकीकरण करावे, भविष्यात त्या ठिकाणी कचरा टाकणे व जाळण्यास कायमस्वरूपी बंदी घालावी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आरोग्य विभागामार्फत हवा व पाण्याची तपासणी करावी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ स्थळ पाहणी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशा प्रमुख मागण्या केल्या आहेत.

या निवेदनावर मनसेचे सातारा जिल्हा सचिव अमोल सुभाष कांबळे, कराड तालुका अध्यक्ष रणजीत कदम, उंब्रज शहराध्यक्ष विजय वाणी यांच्यासह संदीप राठोड, विक्रम भंडारे, संतोष किरतकर्वे, प्रविण चव्हाण, आशिष धावारे, अशोक गाडे, विजय पवार, सुमित चव्हाण, शंभू रोकडे तसेच परिसरातील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अन्य रहिवाशांच्या स्वाक्षऱ्या आहेत. मनसेने इशारा दिला असून, प्रशासनाने तातडीने या प्रश्नाची दखल घेतली नाही तर नागरिकांना सोबत घेऊन तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

Satara Water Crisis: साताऱ्यात पाण्याच्या थेंबासाठी रास्ता रोको! दोन दिवसांपासून पाणी बंद असल्याने नागरिक आक्रमक

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra