वर्धा, ब्युरो : जिल्ह्यात नवीन शैक्षणिक सत्र सुरू होऊन एक महिना उलटला आहे. मात्र, जिल्ह्यातील शासकीय शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या गणवेशासाठी अद्याप निधी प्राप्त झालेला नाही.
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना २ गणवेश देण्याचा दावा करणाऱ्या शासन व प्रशासनाच्या या ढिसाळ कार्यपद्धतीबाबत पालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
पहिल्या गणवेशाच्या शिल्लक निधीसह दुसऱ्या गणवेशाचा पूर्ण निधी मिळून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला १ कोटी ४८ लाख ८२ हजार ४०० रुपयांच्या अनुदानाची प्रतीक्षा आहे. नवीन ऑनलाइन प्रणालीद्वारे शिक्षण विभागाने वरिष्ठ स्तरावर निधीची मागणी पाठविली आहे. जिल्ह्यातील ९५० शासकीय व अनुदानित शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंतच्या ४१ हजार ३४० विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेचा लाभदिला जात आहे.
यासाठी शासनाने पहिल्या टप्प्यात प्रति गणवेश २४० रुपये या प्रमाणे ९९ लाख २१ हजार ६०० रुपये निधी मंजूर करून तालुकास्तरावर वितरित केला आहे. या निधीतही पालकांना स्वतःच्या खिशातून काही रक्कम खर्च करून एक गणवेश शिवून घ्यावा लागला आहे. हा गणवेश परिधान करूनच विद्यार्थी शाळेच्या पहिल्या दिवशी दाखल झाल्याचे सांगण्यात येते. प्रत्येक विद्यार्थ्याला दरवर्षी दोन गणवेश देण्याची तरतूद आहे. यामध्ये एक नियमित शालेय गणवेश, तर दुसरा स्काऊट-गाइड गणवेश असतो.
कोलमाइन्स प्रकल्पावर हरकतींचा भडीमार, नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांकडे तक्रार
शासनाकडून प्रति गणवेश ३०० रुपये, म्हणजेच प्रत्येक विद्यार्थ्यांमागे ६०० रुपये देण्याची तरतूद आहे. मात्र, पहिल्या गणवेशासाठी प्रति विद्यार्थी ६० रुपये शिल्लक रक्कम, तर दुसऱ्या गणवेशासाठी ३०० रुपये अद्याप वितरित करण्यात आलेले नाहीत. शाळा सुरू होऊन महिन्यापेक्षा अधिक कालावधी लोटला तरी शिक्षण विभागाला हा शिल्लक निधी मिळालेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना दुसरा गणवेश नेमका कधी मिळणार, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
१.४८ कोटी रुपयांच्या निधीची प्रतीक्षा
शिक्षण विभागाला सध्या एकूण १ कोटी ४८ लाख ८२ हजार ४०० रुपयांच्या र अतिरिक्त निधीची प्रतीक्षा आहे. यामध्ये पहिल्या गणवेशाची शिल्लक रक्कम २४ लाख ८० हजार ४०० रुपये, तर दुसऱ्या गणवेशासाठी १ कोटी २४ लाख २ हजार रुपये समाविष्ट आहेत, जिल्ह्यात पहिली ते आठवीपर्यंतच्या एकूण ४१ हजार ३४० विद्यार्थ्यांना गणवेशाचा लाभ मिळणार आहे. यामध्ये समग्र शिक्षा अभियानांतर्गत २८ हजार ८२६, राज्य सरकारच्या योजनेंतर्गत ११ हजार ३७५ आणि पीएम श्री योजनेंतर्गत १ हजार १३९ विद्यार्थी आहेत.
दरम्यान, गतवर्षी विद्यार्थ्यांच्या बूट व मौज्यांसाठी प्रति विद्यार्थी १७० रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, यंदा त्यासाठीही अद्याप कोणताही निधी मंजूर झालेला नाही. त्यामुळे गणवेशासोबतच बूट-मोज्याच्या निधीबाबतही पालकांमध्ये संभ्रम कायम आहे.
६०० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित, ५१ हजार ग्राहकांकडे १२.३२ कोटींची महावितरणची थकबाकी

