वडूज : दिवसेंदिवस खेडेगावातील लोकांचा कल छोट्या-मोठ्या शहरात वास्तव्य करण्याकडे वाढत चालला आहे. या वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर लोकांना दर्जेदार नागरी सुविधा मिळणे गरजेचे आहे.
असे मत आ. जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले.
दहिवडी (ता. माण) येथील श्री सिध्दीविनायक गृहप्रकल्पाच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख, झी टॉकिजचे किर्तन केसरी ह.भ.प. सागर बोराटे, शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष बळवंतराव पाटील, नगराध्यक्ष धनाजी जाधव, अरुणराव गोरे, माजी सभापती अतुल जाधव, अर्जुनराव काळे, सतिशराव जाधव, शेखर गांधी यांची प्रमुख उपस्थिती होती.
गोरे म्हणाले, शहरातील नागरीकांच्या सुविधांसाठी नगरविकास खात्याच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांच्या विकास योजना येत असतात. या योजनांची योग्य प्रकारे राबवणूक होणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस शहराचा विस्तार वाढत आहे. वाढता विस्तार डोक्यात ठेवून संभाव्य आराखडा तयार करणे अपेक्षित आहे. सिध्दीविनायक प्रकल्प हा अत्याधुनिक सोयीसुविधांयुक्त असल्याने लोकांना चांगल्या सोयी प्राप्त होणार आहेत.
सागर बोराटे म्हणाले, सात्वीक वृत्तीने केलेली कोणतीही कृती योग्यच असते. उद्योग, व्यवसाय करत असताना पैश्याबरोबर समाधान मिळणेही तितकेच महत्वाचे आहे. ज्यांचे ग्राहक संतुष्ट त्यांनाच मोठे मनस्वि समाधान मिळते. सिध्दीविनायक प्रकल्पामुळे दहिवडी शहराच्या वैभवात चांगली भर पडणार आहे.
संचालक नितीनकुमार शेडे यांनी प्रास्ताविक केले. अशोकराव शेंडे, विशाल कर्णे यांनी स्वागत केले. धनंजय क्षीरसागर यांनी आभार मानले.
कार्यक्रमास डांभेवाडीचे माजी सरपंच कृष्णराव बनसोडे, कृषी पर्यवेक्षक देविसास चौधरी, विकास बागल, रविराज महामुनी, प्रोजेक्ट इंजिनिअर अजय शेडे, साईट इंजिनिअर अक्षय शेडे, श्रीमती प्रभावती शेडे, किशोर शेडे, पद्मा शेडे, गिता शेडे आदिंसह शेडे, कर्णे मित्र परिवार उपस्थित होते.
भूमिपूजन कार्यक्रमात आ. जयकुमार गोरे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख यांच्या कर्तबगारीची मुक्तकंठाने प्रशंसा केली. तर काही अधिकारी विचित्र वागत असल्याचा टोलाही अप्रत्यक्षरित्या मारला.

