Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Badlapur : बारवी ९० टक्के भरले; ठाणेकरांना मोठा दिलासा, एमआयडीसी प्रशासनाकडून सतर्कतेचे आदेश

Badlapur : बारवी ९० टक्के भरले; ठाणेकरांना मोठा दिलासा, एमआयडीसी प्रशासनाकडून सतर्कतेचे आदेश

दलापूर : बदलापूरजवळील बारवी धरण क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बारवी धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. बारवी धरण ९० टक्क्यांहून अधिक भरले असल्याने पावसाचा जोर कायम राहिल्यास कोणत्याही क्षणी स्वयंचलित दरवाजे उघडून बारवी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू होण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर, एमआयडीसी प्रशासनाने बारवी नदीकाठच्या गावांना आणि प्रशासकीय यंत्रणांना अत्यंत तातडीचे सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

एमआयडीसीच्या अंबरनाथ येथील बारवी धरण विभागाचे कार्यकारी अभियंता उमेश देशमुख यांनी ३ ऑगस्टला कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर आणि मुरबाड येथील तहसीलदारांना एक अत्यंत तातडीचे पत्र पाठवून बारवी धरणातील संभाव्य विसर्गाबाबत माहिती दिली आहे. या पत्रकानुसार, धरणाची पाणीपातळी ७१.६४ मीटरवर पोहोचली असून धरणात ९०.९९ टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे. धरणाची पूर्ण भरण्याची म्हणजेच ओव्हरफ्लो पातळी ७२.६० मीटर इतकी आहे. पाणलोट क्षेत्रातून धरणात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह कोणत्याही क्षणी वाढू शकतो. त्यामुळे धरणाची जलाशय पातळी वाढून बारवी धरणाचे स्वयंचलित वक्रद्वारे उघडून बारवी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू होण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

गावांना सतर्कतेचा इशारा

बारवी धरणात वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. विशेषतः आसनोली, चांदप, चांदपपाडा, पिंपळोली, सागांव, पाटीलपाडा, पादीरपाडा, कारंद, मोऱ्याचा पाडा, चोण, रहाटोली, आघाणवाडी, फणसवाडी, वाकडीची वाडी व नदी काठावरील इतर शहरे येथील सरकारी यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या गावातील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक आणि पोलीस पाटील यांनी स्थानिकांना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याबाबत तातडीने अवगत करावे, अशी विनंती या पत्रात करण्यात आली आहे तसेच या काळात रहिवाशांनी आणि पर्यटकांनी कोणत्याही प्रकारे वाहत्या पाण्यात प्रवेश करू नये तसेच पोहण्यास मज्जाव करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन

कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ आणि ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्सून पूर्वतयारीच्या सूचनेनुसार बारवी धरणाकरिता एक स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षाचा भ्रमणध्वनी क्रमांक ७५०७८३४५०४ असा असून तो माहिती व कार्यवाहीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. वाढत्या पावसामुळे प्रशासनाने सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश दिले असून नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Navshakti