Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बँक निवडणुकीत शिंदे गटासमोर मोठे आव्हान; मुंबई बँकेच्या आगामी निवडणुकीत स्वतंत्र पॅनल उभे करण्याच्या तयारीत

बँक निवडणुकीत शिंदे गटासमोर मोठे आव्हान; मुंबई बँकेच्या आगामी निवडणुकीत स्वतंत्र पॅनल उभे करण्याच्या तयारीत

मुंबई : भाजपचे वर्चस्व असलेल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीत स्वतंत्र पॅनल उभे करण्याच्या हालचाली शिंदे गटामार्फत सुरू झाल्या आहेत. मात्र, या निवडणुकीत स्वतंत्रपणे उतरण्याची तयारी करणाऱ्या शिंदे गटासमोर सक्षम नेतृत्व आणि सहकार क्षेत्रातील अनुभवी उमेदवारांची कमतरता हे मोठे आव्हान ठरण्याची चर्चा आहे.

राज्यात सत्तेत एकत्र असलेल्या महायुती सरकारमधील भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये सहकार क्षेत्रातील निवडणुकीवरून राजकीय सामना रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना मुंबई बँकेच्या आगामी निवडणुकीत स्वतंत्र पॅनल उभे करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे मुंबई बँकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये थेट लढत पाहायला मिळू शकते. भाजपच्या तुलनेत मुंबईतील सहकार क्षेत्रात शिंदे गटाची ताकद आणि अनुभवी नेतृत्वाची उणीव यामुळे निवडणूक एकतर्फी होण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.

मुंबई बँकेची निवडणूक डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत शिंदे गटाने स्वबळावर पाच जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे शिंदे गटाने मुंबई बँकेकडे मोर्चा वळवला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले आमदार प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांचा बँकेच्या राजकारणात मोठा प्रभाव आहे. २०२१ मध्ये झालेल्या मुंबई बँकेच्या निवडणुकीत प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने सर्वच्या सर्व २१ जागांवर विजय मिळवला होता. आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी शिंदे गटामार्फत निवडणूक लढविण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र राजकीय आणि सहकारी समीकरणे यासोबतच सहकार क्षेत्रातील अनुभवी उमेदवारांच्या कमतरतेमुळे शिंदे गटासाठी ही निवडणूक सोपी नसल्याचे जाणकारांचे मत आहे.

सहकार क्षेत्रात भाजपकडे अनेक वर्षांचा अनुभव असलेले नेते, विविध मतदार गटांमध्ये मजबूत संपर्क आणि निवडणूक व्यवस्थापनाची भक्कम यंत्रणा आहे. या तुलनेत शिंदे गटाकडे प्रभावी नेतृत्व हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Navshakti