मुंबई : मुंबईतील मोकळी मैदाने हडपण्याचा भाजपचा डाव आहे. गेल्या चार वर्षांत भाजपने मुंबईतील तब्बल १७ ते १८ मैदाने ढापली असून या मैदानाचे आरक्षण बदलून हे भूखंड भाजपशी संबंधित संस्थांना देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी येथे केला.
आदित्य ठाकरे यांनी मुलुंड पूर्व येथील आरक्षित भूखंडांची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ठाकरे यांनी मुंबईतील मोकळ्या जागांच्या प्रश्नावरून राज्य सरकार आणि मुंबई महापालिका प्रशासनावर जोरदार टीका केली. सगळीकडील मोकळी मैदाने संस्थांच्या हातात देऊन स्वतःचे बिल्डर व कॉन्ट्रॅक्टर आणायचे असा भाजपचा डाव असून त्या विरोधात आम्ही लढा देणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. मुलुंडमधील एका भूखंडाचे उदाहरण देताना ते म्हणाले की, या जागेवर पूर्वी पेट्रोल पंपाचे आरक्षण होते. ते बदलून गॅस स्टेशनसाठी करण्यात आले. त्याचवेळी समोरील भूखंडावर क्रीडा संकुल उभारण्याची शक्यता असताना त्याचे आरक्षण बदलून तो भूखंड पेट्रोल पंपासाठी दाखवण्याचा व ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा त्यांनी केला.
आपला कोणत्याही बिल्डर किंवा कंत्राटदाराशी वैयक्तिक संघर्ष नसून मोकळ्या जागांच्या आरक्षणात बदल करून त्या विशिष्ट संस्थांना देण्याच्या प्रक्रियेलाच वैचारिक विरोध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. डीपीतील आरक्षणांमध्ये बदल करण्याच्या प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत सुधार समिती ही मुंबईची वाट लावणारी समिती झाली असल्याची टीका केली.
...तर तरुणांनी खेळायचे कुठे?
मुंबईतील बेस्टची २२ आगारे, मुलुंडमधील दोन भूखंड, वांद्रे येथील नेव्हिल डिसुझा फुटबॉल मैदान तसेच अंधेरी-जुहू परिसरातील मोकळ्या मैदानांवरही भाजप संबंधित संस्थांचा डोळा आहे. मुंबईतील मोकळी मैदाने गेली तर भविष्यात मोकळा श्वास घेण्यासाठीही जागा उरणार नाही. जेन झी च्या तरुणांसाठी मैदानेच उरली नाहीत, तर त्यांनी खेळायचे कुठे?' असा सवाल ठाकरे यांनी यावेळी केला.
आज 'तिरंगा आंदोलन'
मुंबईतील मैदाने आणि मोकळे भूखंड वाचवण्यासाठी आज (रविवारी) वांद्रे येथे 'तिरंगा आंदोलना'ची हाक आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. वांद्रेतील रंगशारदा येथील नेव्हील डिसुझा ग्राऊंड येथे होणाऱ्या या आंदोलनाच्या माध्यमातून भाजपला रेड कार्ड दाखवले जाणार आहे. तमाम मुंबईकर, क्रीडाप्रेमी, क्रीडा संस्था, स्वयंसेवी संस्था आणि मुंबईप्रेमींनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी यावेळी केले.
(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

