Dailyhunt
भय्यांना मराठी शिकवून काय साध्य होणार? राज ठाकरे यांचा सवाल राज्यकर्त्यांवर आणि माध्यमांवरही टीका

भय्यांना मराठी शिकवून काय साध्य होणार? राज ठाकरे यांचा सवाल राज्यकर्त्यांवर आणि माध्यमांवरही टीका

पुणे : स्वतःच्या राज्यात सुधारणा न करणाऱ्या 'भय्यांना' येथे मराठी शिकवून काय साध्य होणार, असा परखड सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी उपस्थित केला. जेथे जमीन भुसभुशीत असते, तेथेच घुशी शिरतात, अशा शब्दांत त्यांनी महाराष्ट्रातील मवाळ धोरणावर टीका केली.

पुण्यात आयोजित 'पत्रकार वरुणराज भिडे पुरस्कार' सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. परप्रांतीयांना मराठी शिकवण्याच्या मुद्द्यावर बोलताना राज ठाकरे यांनी तमिळनाडू, बंगाल आणि गुजरात या राज्यांची उदाहरणे दिली. त्या राज्यांमध्ये स्थानिक भाषा ठामपणे वापरली जाते. त्यामुळे बाहेरून येणाऱ्यांना ती भाषा शिकावीच लागते, असे त्यांनी नमूद केले. मात्र महाराष्ट्रात मवाळ भूमिका घेतल्यानेच ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लँड माफिया

राज्यातील मराठी शाळांच्या दुरवस्थेवर भाष्य करताना त्यांनी गंभीर आरोप केला. मराठी शाळा बंद पडत नाहीत, तर त्यांच्या मोक्याच्या जागा लाटण्याचा खेळ सुरू आहे, असा दावा त्यांनी केला. मंत्रालयातून हलणाऱ्या फाइल्स या शाळा सुधारण्यासाठी नसून, त्या जमिनी इतरांना देण्यासाठी असल्याचा आरोप त्यांनी केला.

राज्यात 'लँड माफिया' सक्रिय असून, मराठी शिक्षण व्यवस्थेचा बळी दिला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्याच्या पिढीला मूळ प्रश्नांपासून दूर ठेवण्यासाठी आयपीएल, टी-२० क्रिकेट, कॉन्सर्ट्स आणि सोशल मीडियाचा वापर होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. तरुणांनी या आभासी जगात न अडकता सरकारला जाब विचारावा, असे आवाहन त्यांनी केले.

सत्ताधाऱ्यांमध्ये अहंकार

पत्रकारितेच्या स्थितीवर भाष्य करताना त्यांनी राज्यकर्त्यांवरील माध्यमांचा प्रभाव कमी झाल्याची खंत व्यक्त केली. तुमच्या लिहिण्याने आमची सत्ता जात नाही, असा अहंकार सत्ताधाऱ्यांमध्ये निर्माण झाला असल्याचे ते म्हणाले. हा समज मोडण्यासाठी पत्रकारांनी एकजूट दाखवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकारांवरील राजकीय दबावावर टीका करताना त्यांनी म्हटले की, अनेक अनुभवी पत्रकार मंत्र्यांच्या दरबारात दिसतात, ही धोकादायक बाब आहे. सरकार किंवा मालकांकडून दबाव येत असेल, तर पत्रकारांनी एकत्र येऊन अशा नेत्यांच्या बातम्या देणे बंद करावे, असा सल्लाही त्यांनी दिला. तुम्ही एकदा बातम्या देणे बंद करा, मग बघा हे नेते कसे ताळ्यावर येतात, असा रोखठोक इशारा त्यांनी दिला.

महाराष्ट्र दिनाबाबत खंत

१ मे महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी खंत व्यक्त केली. ज्या हुतात्म्यांनी मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली, त्यांना अभिवादन करण्यासाठी मराठी माणूस मोठ्या संख्येने एकत्र येत नाही, असे ते म्हणाले. ही जाणीव जिवंत झाली नाही, तर मराठी माणसाचे अस्तित्व धोक्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Navshakti