Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Devgad : कोकणात विनाशकारी प्रकल्प नकोच..! मुणगे ग्रामसभेत तीव्र आंदोलनाचा इशारा

Devgad : कोकणात विनाशकारी प्रकल्प नकोच..! मुणगे ग्रामसभेत तीव्र आंदोलनाचा इशारा

देवगड : देवगड तालुक्यातील मुणगे ग्रामस्थांनी नियोजित औष्णिक ऊर्जा आणि अणुऊर्जा या प्रदूषणकारी प्रकल्पांना तीव्र विरोध दर्शवला आहे. मुणगे गावची ग्रामसभा नुकतीच आयोजित करण्यात आली होती.

या गावात ४,००० ते ७,२०० मेगावॉट क्षमतेचा 'एनटीपीसी'चा भव्य अणुऊर्जा प्रकल्प प्रस्तावित असून या प्रकल्पासाठी एक लाख कोटींची गुंतवणूक राज्य सरकारने केली आहे.

या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग हे राज्याचे ऊर्जा केंद्र बनणार असले तरी या प्रदूषणकारी प्रकल्पामुळे मुणगे गावाचे तसेच देवगड तालुका आणि जिल्ह्याचेही फार मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाला स्थानिक रहिवासी आणि कोकणवासीयांनी तीव्र विरोध केला आहे.

नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत मुणगेवासीयांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध केला असून तसा ठरावही घेण्यात आला आहे.

कोकणात विनाशकारी प्रकल्पांना 'नो एन्ट्री'; मुंबईकर कोकणवासीयांच्या मेळाव्यात एकजुटीने ठराव मंजूर

या विनाशकारी प्रकल्पाविरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी गावामध्ये कोणत्याही राजकीय नेत्यांना येण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. मुणगेकर ग्रामस्थ आणि मुंबई निवासी, मुणगे रहिवासी यांची एकत्रित ग्रामसभा आयोजित केली होती. त्यात या अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करून शासनाचा तीव्र निषेध करण्यात आला.

मुणगे गाव आणि आसपासच्या परिसरात जमीन मोजणी आणि आरेखनाचे काम सुरू झाल्याचे आढळून आले असून हा प्रकल्प केवळ मुणगे गावासाठीच नव्हे तर संपूर्ण देवगड तालुका व जिल्ह्याच्या पर्यावरणासाठी अत्यंत घातक आहे.

गावांमध्ये जनजागृती सुरू

स्थानिकांना विश्वासात न घेता हा प्रकल्प राज्य सरकार लादत असून हा प्रकल्प त्वरित रद्द करावा अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या दृष्टीने देवगड तालुक्यातील सर्व गावांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Navshakti