Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
दिशा सालियनच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे; वडिलांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाचा आदेश

दिशा सालियनच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे; वडिलांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाचा आदेश

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी मॅनेजर असलेल्या दिशा सालियनच्या मृत्यूचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवण्याचा आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी दिला. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

स्थानिक पोलिसांकडून झालेला तपास अपुरा व अकार्यक्षम असल्याचे स्पष्ट करत सीबीआयला याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या तरतुदींनुसार तात्काळ एफआयआर नोंदवण्याचे आणि दिशाच्या वडिलांचा जबाब नोंदवून घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले. या आदेशामुळे दिशाच्या वडिलांना दिलासा मिळाला आहे.

दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत याचिका दाखल केली होती. मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा संशय सतीश सालियन यांनी याचिकेतून व्यक्त केला होता. याप्रकरणी सर्व युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर राखून ठेवलेला निकाल खंडपीठाने बुधवारी जाहीर केला.

सुनावणीदरम्यान न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या प्राथमिक चौकशीतील विसंगतींवर तीव्र बोट ठेवले: दिशाचा मृत्यू २०२० मध्ये झाला होता. त्यानंतर पोलिसांनी केवळ अकस्मिक मृत्यूची नोंद करून प्रदीर्घ काळ मर्यादित चौकशी केली. त्यामध्ये रीतसर फौजदारी गुन्हा नोंदवण्यात आला नाही. तसेच घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ स्पॉट पंचनामा केला नाही. तो तब्बल ९ तासांनंतर करण्यात आला, असे न्यायालयाने नमूद केले.

दिशाचा मृत्यू ८ जून २०२० रोजी मालाड येथील इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून पडून झाला होता. या निमित्ताने बरेच राजकीय आरोपही झाले होते.

सीबीआयवर विश्वास :

न्यायालयाच्या देखरेखीखाली पुढील तपास करण्याची याचिकाकर्त्यांची मागणी खंडपीठाने फेटाळून लावली. सीबीआयच्या तपासावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आणि ही याचिका निकाली काढली. तपासासाठी सीबीआयच्या मुंबई विभागाला अत्यंत अनुभवी आणि वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Navshakti