Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धा : वैभवची वादळी खेळी; मात्र शतक हुकले

दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धा : वैभवची वादळी खेळी; मात्र शतक हुकले

बंगळुरू : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने ८१ चेंडूंत ९२ धावांची वादळी खेळी साकारली. त्याला शतकाने हुलकावणी दिली. त्याच्या या खेळीनंतरही दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पूर्व विभागाला मध्य विभागाविरुद्ध पहिल्या डावात आघाडी मिळवता आली नाही.

डाव्या हाताचा गोलंदाज हर्ष दुबे (४/६६) तसेच वेगवान गोलंदाज यश ठाकूर (३/६६) आणि आर्यन पांडे (३/४३) यांनी सर्व १० बळी घेत पूर्व विभागाचा पहिला डाव २६६ धावांवर रोखला. मध्य विभागानेही पहिल्या डावात २६६ धावाच केल्या होत्या. दुसऱ्या डावात मध्य विभागाची स्थिती ३ बाद ४५ अशी झाली आहे. दिवसअखेर अमन मोखाडे २३ आणि आर्यन पांडे ४ धावांवर खेळत होते. पूर्व विभागाच्या मुकेश कुमारने मध्य विभागाचा कर्णधार रजत पाटीदारला बाद करत मोठा धक्का दिला.

या सामन्यात बिहारच्या वैभव सूर्यवंशीने इतिहास रचला. तो दिलीप करंडक स्पर्धेत अर्धशतक झळकावणारा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. यापूर्वी १९६९ मध्ये लक्ष्मण सिंग यांनी वयाच्या १६व्या वर्षी हा पराक्रम केला होता, त्यांचा विक्रम वैभवने मोडीत काढला. वैभवने ११८ मिनिटांत ८१ चेंडूंचा सामना करत ९२ धावा केल्या. ४० धावांवर असताना त्याला यश राठोडने सोपा झेल सोडल्यामुळे जीवनदान मिळाले होते. वैभवने यश ठाकूरला डोक्यावरून शानदार षटकार आणि एकाच षटकात चार चौकार मारले. त्यानंतर ऑफ-स्पिनर सरांश जैनला षटकार ठोकत त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील आपले दुसरे अर्धशतक पूर्ण केले.

दुबे आणि आर्यन पांडे यांच्या गोलंदाजीवरही त्याने षटकार मारले. मात्र, दुबेच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात अर्शद खानने त्याचा झेल घेतला आणि त्याचे शतक अवघ्या ८ धावांनी हुकले. वैभवने अभिमन्यू ईश्वरनसह पहिल्या विकेटसाठी १६१ धावांची भागीदारी केली. ईश्वरनने १०६ चेंडूंत ६९ धावा केल्या. वैभव बाद झाल्यानंतर पुढील चेंडूवर हर्ष दुबेने कुमार कुशाग्रला झेलबाद केले. त्यानंतर ईश्वरनला आर्यन पांडेने पायचित बाद केले. पांडेने ४१ व्या षटकात विराट सिंग आणि सुदीप कुमार घारमी यांना तीन चेंडूंच्या अंतरावर बाद करत पूर्व विभागाला धक्के दिले. दुखापतीतून सावरून मैदानात परतलेला कर्णधार ईशान किशनही संघाला सावरू शकला नाही. पूर्व विभागाने शेवटचे ५ फलंदाज अवघ्या ५३ धावांत बाद झाले. ९ बाद २६६ धावांवर असताना एका धावेने आघाडी मिळाली असती, परंतु यश ठाकूरने मुकेश कुमारचा त्रिफळा उडवला.

तिलकचे शतक; दक्षिण विभाग सुस्थितीत

कर्णधार तिलक वर्माचे संयमी नाबाद शतक (१०६) आणि श्रेयस गोपालने केलेल्या ८७ धावांच्या जोरावर दक्षिण विभागाने दुसऱ्या उपांत्य सामन्यात उत्तर विभागाविरुद्ध पहिल्या डावात ९० धावांची मोलाची आघाडी मिळवली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण विभागाने ९ गड्यांच्या मोबदल्यात २८५ धावा केल्या होत्या. उत्तर विभागाचा पहिला डाव सोमवारी पहिल्या दिवशी १९५ धावांवर आटोपला होता. दुसऱ्या दिवशी २ बाद ४० या धावसंख्येवरून पुढे खेळताना दक्षिण विभागाची सुरुवात अतिशय खराब झाली. उत्तर विभागाच्या गुरनूर ब्रारने (४/७०) भेदक मारा करत पहिल्या सत्रात तीन बळी घेतले आणि दक्षिण विभागाची स्थिती ५ बाद ८० अशी बिकट केली. एन जगदीशन (३६) याला ब्रारने त्रिफळाचित केले, तर आर स्मरण (२७) याचा त्रिफळा उडवून त्याला माघारी धाडले. त्यानंतर कोडीमेला हिमतेजाला शून्यावर बाद करत ब्रारने दक्षिण विभागाला पाचवा धक्का दिला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Navshakti