नवी दिल्ली : केंद्र सरकारने परदेशी देणगी नियमन कायद्यांतर्गत (एफसीआरए) नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. परदेशी देणगी मिळवणाऱ्या आणि त्यांचा वापर करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांसाठी आता नियमावली अधिक कडक करण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन केल्यास दंडाच्या रकमेतही वाढ करण्यात आली आहे.
गृह मंत्रालयाने सोमवारी याबाबतची अधिसूचना जारी केली आहे.
दंडाची नवीन तरतूद
प्रशासकीय खर्चासाठी मिळालेल्या एकूण परदेशी देणगीच्या २० टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम खर्च केल्यास, आता १ लाख रुपये किंवा मर्यादेपेक्षा जास्त खर्च केलेल्या रकमेच्या ५ टक्के, यापैकी जी रक्कम जास्त असेल, तो दंड भरावा लागेल.
परदेशी निधीची सट्टेबाजी किंवा तत्सम व्यवहारांत गुंतवणूक केल्यास, १ लाख रुपये किंवा अशा व्यवहारात गुंतवलेल्या रकमेच्या ३० टक्के, यापैकी जी रक्कम जास्त असेल, तो दंड आकारला जाईल.
याशिवाय, अशा गुंतवणुकीतून मिळालेला १०० टक्के परतावा सरकार जप्त करेल. ज्या हेतूसाठी निधी मिळाला आहे, त्याऐवजी इतर कारणांसाठी किंवा ज्या राज्यासाठी परवानगी नाही, तेथे निधी वापरल्यास ३० टक्के दंड किंवा १ लाख रुपये यापैकी जी रक्कम जास्त असेल, ती आकारली जाईल.
महत्त्वाचे बदल
धर्मादाय कारणांसाठी (उदा. धार्मिक शिक्षण, सांस्कृतिक जतन) परदेशी निधी स्वीकारणाऱ्या संस्थांना आता 'धर्मांतरास' मनाई करण्यात आली आहे. ही अट स्पष्टपणे लागू करण्यात आली आहे. जर एखाद्या संस्थेच्या महत्त्वाच्या पदांवर भारतीय वंशाचे नसलेले परदेशी नागरिक असतील, तर अशा संस्थांना परदेशी निधीसाठी नोंदणी किंवा परवानगी मिळणे कठीण होणार आहे. आता संस्थांना त्यांच्या कार्याची नेमकी उद्दिष्टे आणि ते कोणत्या राज्यांत/केंद्रशासित प्रदेशांत काम करणार आहेत, हे निश्चित करून सरकारला सांगावे लागेल.
जुन्या संस्थांसाठी मुदत
२०२६ पूर्वी नोंदणीकृत असलेल्या सर्व संस्थांना त्यांच्या कार्याची उद्दिष्टे सरकारला कळवण्यासाठी आणि अर्जातील माहिती अपडेट करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी देण्यात आला आहे. या नवीन बदलांमुळे एनजीओंच्या कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवण्याचा सरकारचा मानस आहे.

