Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
गणेश गल्लीत अवतरणार 'संतभूमी'! संतांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंगांचे जिवंत दर्शन देखाव्यांतून घडविणार

गणेश गल्लीत अवतरणार 'संतभूमी'! संतांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंगांचे जिवंत दर्शन देखाव्यांतून घडविणार

गिरीश चित्रे / मुंबई

मुंबईतील प्रसिद्ध गणेश गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे यंदा गणेशोत्सवानिमित्त संत परंपरेवर आधारित भव्य देखावा साकारण्यात येणार आहे. 'संतभूमी' ही संकल्पना भाविकांच्या विशेष पसंतीस उतरेल, असा विश्वास गणेश गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रातील थोर संतांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंगांचे जिवंत दर्शन या देखाव्यातून घडविण्यात येणार आहे.

गणेश गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या यंदाच्या देखाव्यात संत तुकाराम महाराजांचे 'वैकुंठगमन' हे विशेष आकर्षण ठरणार आहे. सुमारे ५० फूट उंचीच्या गरुडावर आरूढ होऊन संत तुकाराम वैकुंठाला जात असल्याचे भव्य दृश्य साकारण्यात आले आहे.

संत ज्ञानेश्वर, गोरा कुंभार यांच्या जीवनातील प्रसंग

संत ज्ञानेश्वर महाराजांनी चालविलेल्या भिंतीचा प्रसंगही अत्यंत प्रभावीपणे उभा करण्यात आला आहे. संत गोरा कुंभार यांच्या जीवनातील हृदयदावी प्रसंगदेखील देखाव्यात समाविष्ट करण्यात आला आहे. माती मळताना संत गोरा कुंभार भक्तीत इतके तल्लीन झाले की स्वतःचा मुलगा पायाखाली तुडवला जात असल्याचेही त्यांना भान राहिले नाही, हा प्रसंग भाविकांना भक्तीची पराकाष्ठा समजावून सांगणारा ठरणार आहे.

 संत परंपरेचा भव्य देखावा ठरणार भाविकांचे आकर्षण;  संत परंपरेचा भव्य देखावा ठरणार भाविकांचे आकर्षण;

भाविक, मंडळाचे कार्यकर्ते, स्वयंसेवक यांना विमा संरक्षण

दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश गल्लीतील गणरायाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता असून दररोज दीड लाखांहून अधिक भाविक येथे दर्शनासाठी येतील , असा अंदाज मंडळाने व्यक्त केला आहे. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन मंडळाने सुरक्षेवर विशेष भर दिला आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसह मंडळाचे कार्यकर्ते आणि स्वयंसेवक यांना विमा संरक्षण देण्यात आले आहे.

भक्ती, अध्यात्म, सामाजिक संदेश यांचा संगम

गणेश गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सरचिटणीस स्वप्नील परब यांनी सांगितले की, संतांच्या विचारांचा आणि त्यांच्या समाजप्रबोधनाच्या कार्याचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या देखाव्यातून करण्यात आला आहे. भक्ती, अध्यात्म आणि सामाजिक संदेश यांचा सुंदर संगम असलेला हा देखावा यंदाच्या गणेशोत्सवातील प्रमुख आकर्षणांपैकी एक ठरणार आहे.

मंडळाच्या वतीने शैक्षणिक आरोग्य उपक्रम

लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्ली (मुंबईचा राजा) यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेले 'मोफत नेत्र तपासणी, चष्मा वितरण व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर' अत्यंत यशस्वीरीत्या संपन्न झाले.

विद्यार्थी गुणगौरव सोहळा-२०२६

उत्सव मंडळाच्या वतीने शैक्षणिक उपक्रमांतर्गत विभागातील वर्गणीदार विद्यार्थ्यांना अधिकाधिक प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सन २०२५ - २०२६ या वर्षात शालांत तसेच महाविद्यालयीन वार्षिक परिक्षेमध्ये विशेष नैपुण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला.

संत भूमीतील प्रसंग

  • संत तुकाराम महाराज ५० फुटांच्या गरुडावरुन वैकुंठ भ्रमण.

  • ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली.

  • संत गोरा कुंभार माती मळत असताना भक्तीत इतके तल्लीन झाले की , स्वतःचा मुलगा पायाखाली तुडवला जातोय याचे भान त्यांना राहिले नाही.

  • रोज दीड लाख भाविक दर्शन घेण्याची शक्यता.

  • भाविक, कार्यकर्ते प्रत्येकाला विमा कवच.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Navshakti