Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
गिरगावच्या राजाचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव; गणेश मूर्ती २४ फूट उंच; पण शाडूच्या मातीचीच, राजाचा अनेक पुरस्कारांनी झालाय सन्मान

गिरगावच्या राजाचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव; गणेश मूर्ती २४ फूट उंच; पण शाडूच्या मातीचीच, राजाचा अनेक पुरस्कारांनी झालाय सन्मान

मुंबई : गेल्या काही वर्षांत गणेशोत्सव साजरा करण्याचे स्वरूप बदलत गेले आहे. उंच गणेशमूर्ती, आकर्षक देखावे, नेत्रदीपक रोषणाई याला गणेश मंडळांकडून पसंती दिली जात आहे. तरी आजही 'गिरगावचा राजा'चे मंडळ पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यास पसंती देत आला आहे.

यंदाची गणेशमूर्ती २४ फूट उंच असली तरी ती शाडूच्या मातीपासून साकारण्यात आली आहे, असे मंडळाचे सचिव गणेश लिंगायत यांनी सांगितले. मंडळातर्फे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा तर केला जातोच, पण योग्य ती खबरदारीही घेतली जाते. त्यामुळे गिरगावच्या राजाला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आल्याचे ते म्हणाले.

आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई, उंच गणेशमूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेते. 'गिरगावचा राजा' मंडळ गेल्या ९९ वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करत असून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्राधान्य देण्यात येते. यंदा मंडळाचे ९९ वर्षे असून यंदा तर १० दिवसांत २५ लाखांहून अधिक भाविक बाप्पांच्या दर्शनासाठी येतील, असा विश्वास सचिव गणेश लिंगायत यांनी व्यक्त केला.

यंदा मंडळाचे ९९ वे वर्ष असून बाप्पाच्या मांडीवर भगवान श्रीकृष्ण विराजमान असल्याची आकर्षक संकल्पना साकारण्यात आली आहे. हिंदूंच्या प्रत्येक सणात गणपती बाप्पा आणि श्रीकृष्ण यांची पूजा - अर्चा केली जातेच. त्यामुळे बाप्पा आणि विष्णू एकत्र विराजमान करण्याचा निर्णय घेतला आणि बाप्पाच्या मांडीवर श्रीकृष्णाची मूर्ती विराजमान करण्यात आल्याचे गणेश लिंगायत यांनी सांगितले. दरम्यान, पुढील वर्षी गिरगावच्या राजा १०० व्या वर्षांत पदार्पण करणार आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याचा उत्साह शिगेला पोहोचला असून आतापासूनच पुढच्या वर्षाची तयारीही सुरु केल्याचे ते म्हणाले.

गणेशमूर्ती साकारली शाडूच्या मातीपासून

'गिरगावचा राजा' मंडळाची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे संपूर्ण गणेशमूर्ती शाडूच्या मातीपासून साकारण्यात आली आहे. मंडळाने यापूर्वीही शाडू मातीची गणेशमूर्ती साकारल्यामुळे जागतिक विक्रमही नोंदविला आहे. त्यामुळे मंडळाने यावेळीही पर्यावरणपूरक गणेशोत्सवालाच पसंती दिली आहे. दरम्यान, भक्तांच्या सुरक्षिततेसह विसर्जन मिरवणूक निर्विघ्न पार पडावी, यासाठी मंडळाने यंदा सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Navshakti