Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ग्राहकांची माहिती लीक; SBI कडून ३,८९७ खातेधारकांच्या नोंदीबाबत चौकशी सुरू

ग्राहकांची माहिती लीक; SBI कडून ३,८९७ खातेधारकांच्या नोंदीबाबत चौकशी सुरू

मुंबई : बँकेच्या थ्रेट इंटेलिजन्स सर्व्हिस प्रोव्हायडर, डिफेन्स सायबर एजन्सी आणि सीईआरटी-इन यांच्याकडून मिळालेल्या इशाऱ्यानंतर, ३,८९७ ग्राहकांच्या वैयक्तिक ओळखीची माहिती डार्क वेबवर लीक झाल्याच्या शक्यतेची बँक चौकशी करत असल्याचे देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने बुधवारी अखेर जाहीर केले.

स्टेट बँक ऑफ इंडियाने बुधवारी केलेल्या नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, डार्क वेबवर उपलब्ध असलेल्या ३.७५ लाख नोंदींच्या प्राथमिक विश्लेषणामध्ये ३,८९७ ग्राहकांच्या संवेदनशील नोंदी आढळल्या आहेत. यामध्ये नोंदणीकृत मोबाईल नंबर, जन्म तारीख, नावे, लिंग, ई-मेल पत्ते आणि रहिवासी पत्त्यांचा समावेश आहे.

लीक झालेल्या माहितीमध्ये कथितपणे शाखा आणि कस्टमर इन्फॉर्मेशन फाइल आयडेंटिफायर्स, लीड आयडी्स तसेच कर्ज आणि लीड रेकॉर्डशी संबंधित इतर मेटॅडाटाचाही समावेश असल्याचे वृत्त आहे. बँकेने म्हटले आहे की, लीक डेटाची सत्यता आणि पूर्णता निश्चित करण्यासाठी संभाव्य स्त्रोत आणि प्रसाराची व्याप्ती शोधून काढण्यासाठी तसेच ग्राहक आणि बँकेपुढील धोक्यांचे मूल्यांकन करण्यासाठी सविस्तर चौकशी करणे आवश्यक आहे.

एसबीआयने सांगितले की, तडजोडीची सर्वसमावेशक छाननी आणि तपास करण्यासाठी सीईआरटी-इनद्वारे सूचीबद्ध स्वतंत्र सायबर सुरक्षा एजन्सीची मदत घेण्यात आली आहे.

इशारा दिला होता...

गेल्या आठवड्यात सीईआरटी-इनने गंभीर इशारा जारी केला होता. त्यामध्ये स्वायत्त एआय एजंट्सनी भारतीय संस्थांच्या थेट प्रणालींमध्ये आणि गोपनीय डेटावर अनधिकृतपणे प्रवेश केल्याबाबत सावध केले होते.

भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद पथकाने 'एआय एजंट्स अ‍ॅज अटॅक व्हेक्टर्स' शीर्षकाखाली सल्लागारात भारतीय संस्थांच्या माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान पायाभूत सुविधांना लक्ष्य करणाऱ्या घटनांच्या दोन वेगवेगळ्या श्रेणींवर प्रकाश टाकला आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Navshakti