Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ज्ञानाग्राही समाजाच्या नवनिर्मितीसाठी...

ज्ञानाग्राही समाजाच्या नवनिर्मितीसाठी...

अस्वस्थ वर्तमान

डॉ. प्रवीण बनसोड

जच्या अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगात आपला समाज बुद्धीविहीन माहितीचे आदान-प्रदान करीत असतो. त्यामुळेच माहितीचे आदान-प्रदान करताना विवेकी ज्ञानाचा आग्रह धरणाऱ्या समाजाच्या नवनिर्मितीचे आव्हान आपल्याला पेलावे लागणार आहे.

समाजजीवन हे मुख्यत्वेकरून अनुकरणावर अवलंबून असते. क्वचित एखादी अलौकिक व्यक्ती नवनिर्मिती करून एखादा नवा विचार, नवा आचार, नवा संप्रदाय, नवी वर्तनपद्धती शोधून काढते. मग या गोष्टी अनुकरणाने समाजात प्रसृत होतात आणि समाजजीवनात समान आचारविचार दृढमूल होऊन सारखेपणा आणि सुरळीतपणा येतो. या नवनिर्मितीमुळे प्रगती होते, तर अनुकरणामुळे समाजाला स्थैर्य प्राप्त होते. परंतु या नवनिर्मितीचा प्रसार होऊ लागला, की तिचा रूढ आचार-विचारांशी संघर्ष होतो आणि या संघर्षाची समाप्ती अखेर समन्वयात होते. समन्वय हाही एक प्रकारची नवनिर्मितीच असते. तिचाही सर्वत्र प्रसार होऊ लागला, की पुन्हा नवा संघर्ष निर्माण होतो आणि पुनश्च नवीन समन्वय घडून येतो. हा चक्रनेमिक्रम सतत चालू राहतो." असे गाब्रिएल तार्द (१८४३-१९०४) या नामवंत फ्रेंच सामाजिक विचारवंताने लिहून ठेवले. नावीन्याचा शोध ही प्राचीन काळापासून तर आजच्या अत्याधुनिक काळापर्यंत चालणारी एक निरंतर प्रक्रिया आहे. 'बुद्धी किंवा विषयाचे आकलन करण्याचे सामर्थ्य म्हणजे ज्ञान' असा अर्थ 'महाराष्ट्र शब्दकोश' (दाते, कर्वे)मध्ये दिलेला आहे, तर "सुसंघटित माहिती म्हणजे ज्ञान किंवा सुसंघटित माहिती प्राप्त केल्यावर होणारा समज किंवा जाणीव म्हणजे ज्ञान" (रँडम हाऊस डिक्शनरी ऑफ दि इंग्लिश लँग्वेज) असा अर्थ दिलेला आहे. 'वैज्ञानिक पद्धती म्हणजे यथार्थ ज्ञान संपादन करण्यासाठी अनुसरावयाची व्यवस्थित व कार्यक्षम रीती होय' (डायमंड सामाजिक ज्ञानकोश २००७) या व्याख्येत 'यथार्थ ज्ञान' असा शब्द वापरण्यात आला आहे.

ख्रिस्तपूर्व ३०० मध्ये ॲरिस्टॉटलने लॉजिक (तर्कशास्त्रा)चा पाया घातला. कोणत्याही विचारामागे यथायोग्य तर्क हाच पाया असतो. तर्काशिवाय ज्ञान किंवा साधी माहितीही अपूर्ण असेल. निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती यांची सुसंगती लावली की ज्ञानाकडे प्रवास सुरू होतो. ज्ञान म्हणजे केवळ माहितीची साठवणूक नव्हे, विश्लेषण करण्याची आणि जगाकडे पाहण्याची एक स्वतंत्र प्रतिभा होय. गोपाळ गणेश आगरकर यांनी म्हटलेलं आहे की, "नुसतं ज्ञान वाढून फायदा नाही त्याप्रमाणे वागण्याचे धैर्य यायला पाहिजे." ज्ञान हा मानवी जीवनातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. माणूस जन्माला आल्यानंतर त्याच्या सभोवतालच्या जगाचे निरीक्षण करतो, अनुभव घेतो, प्रश्न विचारतो आणि त्या अनुभवातून शिकत जातो. या शिकण्याच्या प्रक्रियेतून त्याला विविध गोष्टींची माहिती व समज प्राप्त होते. या माहितीला विचार, अनुभव, तर्क आणि आकलनाची जोड मिळाल्यानंतर त्याचे रूप ज्ञानात होते.

सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, एखाद्या वस्तू, व्यक्ती, घटना, विषय किंवा परिस्थितीविषयी योग्य माहिती मिळणे, तिचे आकलन होणे आणि त्या माहितीचा योग्य उपयोग करता येणे म्हणजे ज्ञान होय. वाचन, लेखन, शिक्षण, निरीक्षण, प्रयोग, चर्चा, प्रश्न विचारणे आणि प्रत्यक्ष अनुभव यांमधून ज्ञान प्राप्त होते. शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे आपल्याला शैक्षणिक माहिती देतात; परंतु जीवनातील अनुभवही आपल्याला अनेक महत्त्वाच्या गोष्टी शिकवतात. उदाहरणार्थ, एखाद्या पुस्तकातून शेतीविषयी माहिती मिळणे हे पुस्तकातून मिळालेली माहिती आहे; परंतु प्रत्यक्ष शेतात काम करून पिकांची निगा राखण्याचा अनुभव मिळणे हे अनुभवातून मिळालेले ज्ञान आहे.

माहिती आणि ज्ञान हे शब्द समान वाटत असले तरी त्यांच्यात फरक आहे. एखाद्या विषयाविषयी काही तथ्ये माहीत असणे म्हणजे माहिती. त्या माहितीचा अर्थ समजून घेणे, तिचे विश्लेषण करणे आणि योग्य वेळी योग्य पद्धतीने तिचा उपयोग करणे म्हणजे ज्ञान. उदाहरणार्थ, एखाद्या औषधाचे नाव माहीत असणे ही माहिती आहे; परंतु ते औषध कशासाठी वापरले जाते, त्याचा योग्य वापर कसा करावा आणि त्याबाबत कोणती काळजी घ्यावी हे समजणे म्हणजे ज्ञान. समाज व्यवहार आणि जीवनातील प्रत्यक्ष अनुभवातून प्राप्त होणाऱ्या ज्ञानामुळे माणसाच्या विचार करण्याच्या पद्धतीत बदल होतो.

ज्ञानामुळे व्यक्ती आत्मनिर्भर बनते. शिक्षण आणि ज्ञानाच्या माध्यमातून व्यक्ती आपल्या क्षमतांचा विकास करू शकते. विज्ञान, तंत्रज्ञान, वैद्यकीय क्षेत्र, शेती, उद्योग, प्रशासन आणि कला या सर्व क्षेत्रांच्या विकासामागे मानवी ज्ञानाचा मोठा वाटा आहे. ज्ञान केवळ स्वतःच्या प्रगतीसाठी नसून समाजाच्या नवनिर्मितीसाठी आवश्यक आहे. सामाजिक समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आणि मानवता यांसारखी मूल्ये समजून घेण्यासाठीही ज्ञान आवश्यक आहे. ज्ञानाला विवेकाची जोड मिळाली तर व्यक्ती अधिक जबाबदार आणि सुजाण बनते. ज्ञानाचा उपयोग मानवकल्याणासाठी झाला पाहिजे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास हा ज्ञानामुळे झाला; परंतु त्याचा वापर योग्य दिशेने करणे ही व्यक्तीची आणि समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. ज्ञान ही केवळ पुस्तकांमध्ये साठवलेली माहिती नसून समज, अनुभव, विचार, तर्क, विवेक आणि योग्य कृती यांचा संगम आहे. 'ज्ञान हे व्यक्तीच्या विकासाचे आणि समाजाच्या प्रगतीचे प्रभावी साधन आहे.' सतत शिकणे, प्रश्न विचारणे, अनुभवातून धडे घेणे आणि मिळालेल्या ज्ञानाचा योग्य उपयोग करणे हीच ज्ञानप्राप्तीची खरी दिशा आहे.

भारतामध्ये एकेकाळी ज्ञानगंगा वाहत होती, ही गोष्ट खरी आहे. भारतामध्ये नालंदा, तक्षशिला यांसारखी आंतरराष्ट्रीय कीर्तीची विद्यापीठे होती. बुद्ध, त्याच्या आधीचे चार्वाक आणि लोकायत यांनी त्या काळामध्ये कार्यकारणभाव सांगितलेला होता. इ.स.नाच्या पाचव्या शतकामध्ये या ठिकाणी वराहमिहीर झाला. त्याने सूर्य हा तारा आहे, असं सांगितलं. त्याच्यानंतर आर्यभट्टाने सांगितलं की, 'मला स्वतःला असं वाटतं की, जरी सूर्य हा पृथ्वीभोवती फिरतो असं दिसत असलं, तरी पृथ्वी सूर्याभोवती फिरते'. शून्याचा शोध भारतामध्ये लागला आणि या शोधाने जगातल्या गणिताची एक फार मोठी अडचण दूर केली. सुश्रूतासारखा एक अतिशय उत्तम दर्जाचा शल्यविशारद भारतामध्ये निर्माण झाला. त्याने रोपण शस्त्रक्रियेची (प्लास्टिक सर्जरीची) मुहूर्तमेढ रोवली. मानव हा काय आहे आणि मानवाचे विश्वातील स्थान कोणते हे निश्चित करणे आणि त्या आधारावर मानवाला योग्य असा जीवनमार्ग कोणता याचा शोध घेणे. आज विश्वाच्या वेगवेगळ्या विभागांचा वा अंगांचा अभ्यास करणारी अनेक स्वतंत्र विज्ञाने आहेत. उदा., भौतिकी, रसायनशास्त्र, जीवविज्ञान इ. आणि त्यांनी विश्वाची सर्व अंगे वाटून घेतलेली आहेत. पण जगात भारत, ग्रीक, रोम इ. प्राचीन संस्कृती प्रौढावस्थेत आल्या तेव्हा, विद्या किंवा ज्ञान हे स्वतंत्र मूल्य म्हणून आदरणीय झाले.

रोजच्या वापरात आपण 'ज्ञान' या संकल्पनेचा वापर करतो, परंतु त्यामुळे 'ज्ञान' या शब्दाचा मर्यादित अर्थ गृहीत धरला जातो. दैनंदिन जीवनात आपण ज्ञान आणि माहिती हे शब्द समानार्थी वापरतो. परंतु माहितीचे किंवा आजच्या भाषेत 'डेटा'चे विश्लेषण करून, त्यातील घटकांची निवड करून, त्यांचे वर्गीकरण करून किंवा त्यांचे सार काढून त्याला सुसंघटित रूप दिल्यावर 'डेटा'चे रूपांतर माहितीत करता येते. माहितीमध्ये 'डेटा'चे रूपांतर अर्थपूर्ण उपयुक्त अशा माहितीत होत असल्याने 'डेटा'पेक्षा 'माहिती' अधिक महत्त्वाची असते. त्यानंतर तर्क, विश्लेषण, प्रयोग आणि अनुभव यातून एकात्म स्वरूपाचे ज्ञान जन्माला येते. आजच्या अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगात आपला समाज बुद्धीविहीन माहितीचे आदान-प्रदान करीत असतो. त्याचा वेग मानवी विचारांच्या पलीकडचा आहे. त्यामुळेच माहितीचे आदान-प्रदान करताना विवेकी ज्ञानाचा आग्रह धरणाऱ्या समाजाच्या नवनिर्मितीचे आव्हान आपल्याला पेलावे लागणार आहे.

(लेखक सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत.)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Navshakti