Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
इस्रायलची लेबनॉनमध्ये कारवाई; अमेरिका-इराण चर्चा तूर्त रखडली

इस्रायलची लेबनॉनमध्ये कारवाई; अमेरिका-इराण चर्चा तूर्त रखडली

झुरिच : गेल्या काही दिवसांत झालेल्या वेगवान घडामोडींनंतर, अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हॅन्स आणि इराणच्या प्रतिनिधींमधील ऐतिहासिक चर्चा तूर्तास रखडली आहे. इराणचा अणू कार्यक्रम आणि 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधील कच्च्या तेलाची वाहतूक पूर्ववत करण्याच्या उद्देशाने दोन्ही देशांमध्ये ६० दिवसांचा महत्त्वपूर्ण करार झाला होता.

या करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत वाटाघाटींना हा पहिला मोठा फटका बसला आहे.

या वाढत्या तणावामुळे स्वित्झर्लंड येथे शुक्रवारपासून सुरू होणारी अमेरिका आणि इराणमधील महत्त्वपूर्ण चर्चा तूर्तास पुढे ढकलण्यात आली आहे. या बैठकीला अमेरिकेचे व्हॅन्स उपस्थित राहणार होते. कायमस्वरूपी युद्धबंदीसाठी ही चर्चा अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, मध्यस्थ देश सध्या लेबनॉनमधील परिस्थिती शांत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

व्हॅन्स शुक्रवारी रात्री स्वित्झर्लंडमधील ओबर्गन या पर्वतीय गावातील एका रिसॉर्टमध्ये तांत्रिक चर्चेसाठी रवाना होणार होते. त्यांच्या स्वागतासाठी स्वित्झर्लंडमध्ये डझनावारी व्हाईट हाऊसचे अधिकारी, सुरक्षा यंत्रणा आणि माध्यम प्रतिनिधी दाखल झाले होते. मात्र, गुरुवारी संध्याकाळी अचानक हा दौरा रद्द करण्यात आला. व्हाईट हाऊसने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या चर्चेची पूर्वतयारी अत्यंत क्लिष्ट आणि अनपेक्षित असल्याने चर्चा पुढे ढकलण्यात येत आहे, परंतु उपाध्यक्ष चर्चेसाठी पूर्णपणे तयार आहेत.

इराणच्या गोटातून मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायलने दक्षिण लेबनॉनमध्ये सुरू ठेवलेल्या लष्करी कारवाईमुळे इराणने आपले प्रतिनिधीमंडळ स्वित्झर्लंडला पाठवण्यास नकार दिला आहे. गुरुवारीच इस्रायली हवाई हल्ल्यात १८ जण ठार झाले, तर हिजबुल्लासोबतच्या लढाईत ४ इस्रायली सैनिक मारले गेले. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत इस्रायलच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, तोपर्यंत त्यांचे सैन्य दक्षिण लेबनॉनमधील 'सुरक्षा क्षेत्रात' तैनात राहील. इराणची मागणी आहे की, इस्रायलने तेथून माघार घ्यावी, मात्र या अंतरिम करारात इस्रायलच्या माघारीचा स्पष्ट उल्लेख नाही.

अमेरिका-इस्रायल मतभेद

इस्रायल आणि हिजबुल्ला हे या कराराचे थेट भागीदार नाहीत. दक्षिण लेबनॉनच्या ज्या मोठ्या भागावर इस्रायलने ताबा मिळवला आहे, तेथून त्यांनी मागे हटावे अशी इराणची मागणी आहे; मात्र चालू करारात तसा स्पष्ट उल्लेख नाही. नेतान्याहू यांनी सैन्य मागे घेण्यास साफ नकार दिला आहे.

इस्रायलचे दक्षिण लेबनॉनवर हल्ले

इस्रायलच्या सैन्याने गुरुवारी रात्री दक्षिण लेबनॉनमधील अनेक ठिकाणांवर तीव्र हवाई हल्ले केले आहेत. दुसरीकडे, या भागात हिजबुल्लासोबत भीषण संघर्ष सुरू असल्याचे वृत्त आहे. या नव्या संघर्षामुळे इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध संपवण्यासाठी नुकत्याच झालेल्या प्राथमिक कराराला मोठा धोका निर्माण झाला आहे.

कराराला खीळ ?

नुकत्याच झालेल्या तात्पुरत्या करारामध्ये लेबनॉनसह सर्व आघाड्यांवर लष्करी कारवाया तातडीने थांबवण्याचे आणि लेबनॉनच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या करारामुळे इराणच्या अटकावातून 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' आंतरराष्ट्रीय जहाजांसाठी खुली झाली होती, ज्यामुळे खनिज तेलाची वाहतूक पुन्हा सुरू झाली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशातील आर्थिक संकट, वाढती महागाई आणि तेलाच्या गगनाला भिडलेल्या किमतींवर नियंत्रण मिळवण्यासाठी या करारावर स्वाक्षरी केली होती.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Navshakti