Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
जव्हार : चहा महागला, केळीला पसंती

जव्हार : चहा महागला, केळीला पसंती

व्हार : प्रशासकीय केंद्र असल्याने जव्हार शहरात तालुक्यातील ४८ ग्रामपंचायती तसेच दोन ग्रामदान मंडळांमधील नागरिक विविध शासकीय व खासगी कामांसाठी नियमित येत असतात. बाजारपेठ, दवाखाने, बँका आदी कामे आटोपल्यानंतर चहाचा आस्वाद घेणे हा अनेकांचा नेहमीचा दिनक्रम आहे.

मात्र, साखरेच्या दरवाढीमुळे चहाच्या किमतीत वाढ झाल्याने नागरिकांनी आता चहाऐवजी केळीला पसंती देण्यास सुरुवात केली आहे.

जव्हार शहरात शाळा, महाविद्यालये तसेच आयटीआय असल्याने मोठ्या संख्येने विद्यार्थी येतात. चहासोबत बिस्किट, टोस्ट, पाव, ब्रेड आदी पदार्थ घेतल्याने खर्चात आणखी भर पडते. त्यामुळे चहाच्या वाढलेल्या किमतीचा फटका विद्यार्थ्यांनाही बसत असून, त्यांनीही फळांकडे मोर्चा वळवला आहे. केळी तुलनेने स्वस्त असून पोटभरण्यासोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर असल्याने विद्यार्थी आणि नागरिकांकडून केळीला अधिक पसंती मिळत आहे.

जव्हारच्या बाजारपेठेत केळीच्या मागणीत वाढ झाल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. कमी खर्चात भूक भागविणारा पर्याय म्हणून केळी नागरिकांच्या पसंतीस उतरली आहे. साखरेच्या दरवाढीचा परिणाम केवळ चहाच्या किमतीवरच नव्हे, तर ग्राहकांच्या पसंतीवर आणि दैनंदिन खाण्याच्या सवयींवरही होत असल्याचे या बदलातून दिसून येत आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Navshakti