Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कर्नाटकात नेतृत्वबदलाचे संकेत; मुख्यमंत्री सिद्धरामय्यांकडून राजीनाम्याची घोषणा, डी. के. शिवकुमार यांची वर्णी लागणार?

कर्नाटकात नेतृत्वबदलाचे संकेत; मुख्यमंत्री सिद्धरामय्यांकडून राजीनाम्याची घोषणा, डी. के. शिवकुमार यांची वर्णी लागणार?

र्नाटकात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा करताच राज्यातील सत्तांतराच्या चर्चांना वेग आला आहे. अधिकृत 'कावेरी' निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण ब्रेकफास्ट मीटिंगमध्ये त्यांनी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसमोर हा निर्णय जाहीर केला.

यावेळी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हेदेखील त्यांच्या शेजारी उपस्थित होते. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज दुपारी ३ वाजता राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द करण्याची शक्यता असून, कर्नाटकात नेतृत्वबदल जवळपास निश्चित मानला जात आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर या बैठकीतील काही फोटो व्हायरल झाले आहेत. या छायाचित्रांमध्ये डी. के. शिवकुमार हे सिद्धरामय्या यांच्याशी गळाभेट घेऊन पाया पडताना दिसत आहेत. दरम्यान, डी. के. शिवकुमार हे कर्नाटकचे पुढील मुख्यमंत्री होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, सत्तांतर सुरळीत पार पाडण्यासाठी काँग्रेस श्रेष्ठींकडून पडद्यामागे हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे.

वरिष्ठ मंत्र्यांची उपस्थिती

या ब्रेकफास्ट बैठकीला प्रियांक खर्गे, के. जे. जॉर्ज, एम. बी. पाटील, रामलिंगा रेड्डी आणि एच. के. पाटील यांच्यासह अनेक वरिष्ठ मंत्री उपस्थित होते.

राज्यसभेच्या जागेसाठी सिद्धरामय्या यांना रस नसल्याची चर्चा

राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, डी. के. शिवकुमार यांच्यासाठी मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा करण्याच्या बदल्यात सिद्धरामय्या यांना राज्यसभेची ऑफर देण्यात आल्याची चर्चा होती. मात्र, त्या प्रस्तावात त्यांना विशेष रस नसल्याचे सांगितले जात आहे. वृत्तवाहिन्यांच्या माहितीनुसार, सिद्धरामय्या पुढील दोन वर्षे आमदार म्हणूनच सक्रिय राहण्याच्या भूमिकेत आहेत.

शिवकुमार सरकारमध्ये सिद्धरामय्या गटाला महत्त्व?

डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन झाल्यास सिद्धरामय्या समर्थक आमदारांना महत्त्वाची मंत्रिपदे मिळू शकतात, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी मंत्रिमंडळ रचनेकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यपाल बंगळुरूबाहेर

दरम्यान, कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत सध्या बंगळुरूमध्ये नसल्याची माहिती समोर आली आहे. कौटुंबिक कारणामुळे ते बुधवारी रात्री इंदूरला रवाना झाल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या परत येण्याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

राजीनामा राज्यपाल कार्यालयातच

मात्र, मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धरामय्या आपला राजीनामा राज्यपालांच्या कार्यालयातच सादर करणार आहेत. त्यामुळे आजचा दिवस कर्नाटकच्या राजकारणासाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Navshakti