Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Mumbai : आता रस्त्यांवरील धूळ शोषणार; बहुउद्देशीय २९ वाहनांची तैनाती, ८० कोटींचा खर्च

Mumbai : आता रस्त्यांवरील धूळ शोषणार; बहुउद्देशीय २९ वाहनांची तैनाती, ८० कोटींचा खर्च

मुंबई : ऑक्टोबरपासून वाढणाऱ्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई महापालिकेने यंदा नवी रणनीती आखली आहे. गेल्या दोन वर्षांपासून रस्त्यांवर पाण्याची फवारणी करणाऱ्या 'मिस्ट' वाहनांचा वापर करण्यात येत होता.

मात्र त्यातून प्रदूषण कमी करण्यास अपेक्षित यश मिळाले नसल्याने आता महापालिकेच्या पर्यावरण विभागाने थेट रस्त्यांवरील धूळ शोषून घेणारी बहुउद्देशीय वाहने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सुमारे ७९.५ कोटी रुपयांचा खर्च करणार असून एकूण २९ वाहने खरेदी केली जात आहेत.

महापालिकेच्या पर्यावरण विभागाने या वाहनांद्वारे रस्ते झाडणे, धूळ शोषून घेणे, रस्ते धुणे तसेच पाण्याची फवारणी करणे अशी एकाच वेळी अनेक कामे करता येणार आहेत. आतापर्यंत यापैकी सात वाहने पालिकेला प्राप्त झाली असून उर्वरित वाहने लवकरच मिळण्याची अपेक्षा आहे.

२०२३ मध्ये मुंबईतील वायू प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहोचल्यानंतर महापालिकेने २४ मिस्ट व्हॅन्स भाडेतत्त्वावर घेतल्या होत्या. या वाहनांमधून केवळ पाण्याचा फवारा मारून धूळ काही काळासाठी खाली बसवली जात होती. मात्र धुळीचे कायमस्वरूपी निर्मूलन होत नव्हते. नवीन वाहनांमध्ये मात्र 'डस्ट कलेक्शन' तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. वाहनाच्या पुढील बाजूस असलेले ब्रश रस्त्यावरील धूळ आणि कचरा एकत्र करतील, तर सक्शन यंत्रणा ती धूळ थेट वाहनातील चेंबरमध्ये जमा करेल. चेंबर भरल्यानंतर हा कचरा प्रक्रिया केंद्रात पाठवण्यात येईल.

नवी मुंबई, मीरा-भाईंदर आणि पुणे येथे अशा प्रकारच्या वाहनांची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. त्यानंतर पुण्यातील एका कंपनीला टाटा चेसिसवर आधारित ही विशेष वाहने तयार करण्याचे कंत्राट देण्यात आले आहे.

हिवाळ्यात वाऱ्याचा वेग कमी असल्याने पश्चिम द्रुतगती महामार्ग, बीकेसी तसेच प्रमुख रस्त्यांवरील धूळ हवेत दीर्घकाळ तरंगत राहते. त्यामुळे धूळ फक्त खाली बसवण्याऐवजी ती थेट हटविण्यावर महापालिकेचा भर राहणार आहे.

असे करणार काम

  • धूळ शोषण यंत्रणा आणि स्वीपिंग ब्रश

  • वॉटर स्प्रिंकलर व जेट स्प्रे प्रणाली

  • फॉगिंग आणि मिस्टिंग युनिट

  • रस्ते धुण्याची सुविधा

  • रस्त्यांवरील दुभाजकांची स्वच्छता

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Navshakti