Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Mumbai : बाप्पाच्या आगमनावेळी चपलांचा ढीग; लालबाग, परळमध्ये सापडलेल्या चार मेट्रिक टन चपलांचा पुनर्वापर

Mumbai : बाप्पाच्या आगमनावेळी चपलांचा ढीग; लालबाग, परळमध्ये सापडलेल्या चार मेट्रिक टन चपलांचा पुनर्वापर

मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्ती आगमन सोहळ्यांना मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली आहे. आगमन व विसर्जन दिनी लालबाग-परळ परिसरात गणेशभक्तांची अभूतपूर्व गर्दी होते. या गर्दीचा फायदा चोरट्यांनी घेतला, तर दुसरीकडे बाप्पाची एक झलक मोबाईल कॅमेऱ्यात कैद करताना धावपळीत अनेकांच्या चप्पल, बूट हरवल्याचे समोर आले.

त्यानंतर मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने चप्पल बूट जमा केले असता तब्बल चार मेट्रिक टन चप्पल, बूट जमा झालेत. दरम्यान, जमा झालेल्या चप्पल, बुटांचा पुनर्वापर करून ते आदिवासी बांधवांना वाटप करण्यात येणार असल्याचे एफ दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्त वृषाली इंगुले यांनी सांगितले.

१४ सप्टेंबर रोजी लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. परंतु मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील बाप्पाचे आगमन महिनाभर आधीच होण्यास सुरुवात होते. गेल्या काही दिवसांत शनिवार व रविवारी लालबाग, परळ परिसरातून लाडक्या गणरायाचा मोठ्या संख्येने आगमन सोहळा सुरू झाला आहे. मात्र याच गर्दीत अनेक भक्तांचे चप्पल, स्लीपर, सँडल आणि बूट हरवण्याचे किंवा विसरून जाण्याचे प्रकार घडत आहेत. यंदा अशा हरवलेल्या पादत्राणांचा पुनर्वापर करून ती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा अभिनव उपक्रम मुंबई महापालिकेच्या एफ दक्षिण विभागाने हाती घेतला आहे.

लालबाग, परळ आणि चिंचपोकळी परिसरातील गणेशमूर्ती कारखान्यांमधून मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक मंडळांच्या मूर्तींचे आगमन होत आहे.

आदिवासी मुलांना पादत्राणे वाटणार

संकलित करण्यात आलेली पादत्राणे ग्रीन सोल फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेकडे सुपूर्द करण्यात येत आहेत. संस्थेच्या भिवंडी येथील कार्यशाळेत या पादत्राणांवर पुनर्प्रक्रिया करून त्यांचे दुरुस्ती व पुनर्निर्माण केले जाणार आहे. त्यानंतर ही पादत्राणे गरजू मुले, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबे तसेच आदिवासी भागातील नागरिकांना वितरित केली जाणार आहेत.

गणेशोत्सव काळात उपक्रम राबवणार

यामुळे एका बाजूला कचऱ्याचे प्रमाण कमी होणार असून दुसऱ्या बाजूला सामाजिक उपयोगही साधला जाणार आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. विशेष म्हणजे हा उपक्रम केवळ आगमन सोहळ्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण गणेशोत्सव काळात राबविण्यात येणार आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Navshakti