मुंबई : मुंबई महापालिकेत बदल्या रेट कार्ड ठरले, असा आरोप भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी केला. त्यानंतर बुधवारी मुंबई महापालिकेने परिपत्रक जारी करत आता अभियंत्यांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने होणार असून तीन वर्षांहून अधिक काळ एकाच विभागात असेल तर प्राधान्यक्रम सादर करावा लागणार आहे.
पालिका या निर्णयामुळे आता बदल्यांवरुन होणाऱ्या आरोपांना पूर्णविराम मिळणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
महापालिकेने २ सप्टेंबर २०२६ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, एकाच खाते किंवा विभागात सलग तीन वर्षे किंवा त्याहून अधिक काळ कार्यरत असलेल्या अभियंत्यांची बदली दरवर्षी १ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या प्रक्रियेसाठी संबंधित अभियंत्यांना ५ सप्टेंबर ते २० सप्टेंबर २०२६ या कालावधीत ऑनलाइन अर्ज करून बदलीसाठी प्राधान्यक्रम सादर करावा लागणार आहे. कर्मचाऱ्यांना किमान एक आणि कमाल पाच प्राधान्यक्रम देण्याची मुभा असेल. ऑफलाइन पद्धतीने प्राधान्यक्रम स्वीकारले जाणार नाहीत.
दिव्यांग किंवा वैद्यकीय कारणांमुळे बदलीची आवश्यकता असलेल्या कर्मचाऱ्यांनाही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
पालिका प्रशासनाच्या मते, उपलब्ध रिक्त पदे, प्रशासकीय आवश्यकता आणि लागू नियमांचा विचार करून संगणकीकृत रॅण्डमायझेशन प्रणालीद्वारे अंतिम निर्णय घेतला जाईल.
(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

