Dailyhunt
NCB चा डी-कंपनीला धक्का; कुख्यात ड्रग्ज तस्कर सलीम डोलाला मुंबईत आणले; आज कोर्टात करणार हजर

NCB चा डी-कंपनीला धक्का; कुख्यात ड्रग्ज तस्कर सलीम डोलाला मुंबईत आणले; आज कोर्टात करणार हजर

मुंबई : कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी आणि अमली पदार्थ तस्कर मोहम्मद सलीम डोला याला अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) बुधवारी संध्याकाळी दिल्लीहून मुंबईत आणले. एनसीबीच्या अधिकाऱ्यांचे एक पथक डोला याला घेऊन मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले.

त्यानंतर त्याला दक्षिण मुंबईतील एनसीबी कार्यालयात नेण्यात आले. त्याला गुरुवारी न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

तुर्कीहून प्रत्यार्पण करून मंगळवारी डोला याला दिल्लीत आणण्यात एनसीबीला यश आले होते. भारत सरकारच्या विनंतीवरून मार्च २०२४ मध्ये इंटरपोलने जारी केलेल्या रेड नोटीसच्या आधारे ५९ वर्षीय डोला याला तुर्कीमध्ये अटक करण्यात आली होती. तो भारतातील अमली पदार्थ तस्करीच्या अनेक प्रकरणांमध्ये हवा होता आणि गेल्या काही काळापासून सुरक्षा यंत्रणांना चकवा देत होता. दिल्लीतील एका न्यायालयाने मंगळवारी डोला याला मुंबईत नेण्यासाठी एनसीबीला दोन दिवसांची ट्रान्झिट रिमांड मंजूर केली होती.

३१ डिसेंबर १९६६ रोजी जन्मलेला डोला हिंदी आणि मराठी भाषा बोलतो. त्याच्यावर 'एनडीपीएस' कायद्यांतर्गत अनेक गंभीर आरोप आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Navshakti