सॅन फ्रान्सिस्को : कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या युगात वाढणाऱ्या नव्या पिढीसाठी ओपनएआय या आघाडीच्या तंत्रज्ञान कंपनीने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. १३ ते १७ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांसाठी विशेष रचना केलेले 'चॅट जीपीटी फॉर टीन्स' हे नवीन व्हर्जन कंपनीने लाँच केले आहे.
अभ्यासातील मदत, दैनंदिन प्रश्न आणि संवादासाठी मुलांकडून एआयचा वाढता वापर लक्षात घेऊन अधिक कडक सुरक्षा नियमावलीसह हे टूल बाजारात आणले गेले आहे.
आत्महत्या, स्व-इजा, मद्यपान किंवा अमली पदार्थांचे सेवन, तसेच लैंगिक किंवा रोमँटिक संवादांसारख्या संवेदनशील विषयांवर या चॅटबॉटवर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. हे टूल विद्यार्थ्यांना थेट उत्तरे किंवा निबंध तयार करून देण्याऐवजी, त्यांना स्वतः उत्तर शोधण्यासाठी टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन करेल.
मुलांमध्ये एआयबद्दल 'भावनिक अवलंबित्व' वाढू नये, यासाठी चॅटबॉट स्वतःला मानवी भावना असल्याचे किंवा तो जिवंत असल्याचे दाखवू शकणार नाही. पालक आणि मुलांच्या संमतीने खाती लिंक केली जाऊ शकतात. याद्वारे पालकांना मुलांच्या वापरासाठी 'क्वाएट आवर्स' निश्चित करता येतील. तसेच मूल अडचणीत असल्यास पालकांना सुरक्षेच्या सूचना पाठवल्या जातील.कंपनी युजर्सच्या प्रश्नांच्या स्वरूपावरून त्यांच्या वयाचा अंदाज लावेल आणि १८ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या युजर्सना स्वयंचलितपणे या 'टिन व्हर्जन'वर वर्ग केले जाईल.
(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

