जगभरातील आयटी क्षेत्रात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. दिग्गज कंपनी ओरॅकलने अलीकडेच हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे अनेकांच्या आयुष्यावर परिणाम झाला.
मात्र, या तणावपूर्ण वातावरणात एका कर्मचाऱ्याची वेगळीच प्रतिक्रिया समोर आली आहे. "आज सकाळी उठल्यावर माझ्या खांद्यावर जगाचं ओझं नव्हतं," असं सांगत त्याने नोकरी गेल्यानंतरही दिलासा मिळाल्याचं व्यक्त केलं. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.
नेमकं काय घडलं?
ओरॅकल कंपनीने खर्च कपात आणि नव्या व्यवसायिक धोरणांशी जुळवून घेण्यासाठी जगभरातून मोठ्या प्रमाणावर नोकरकपात केली. अंदाजे २०,००० ते ३०,००० कर्मचाऱ्यांना एका झटक्यात कामावरून कमी करण्यात आलं. अनेकांना कोणतीही पूर्वसूचना न देता थेट ईमेलद्वारे सेवामुक्तीची माहिती देण्यात आली, ज्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली.
'आज सकाळी उठल्यावर माझ्या खांद्यावर जगाचं ओझं नव्हतं…'
"आज पहिलाच दिवस आणि मी ताजातवाना वाटतो आहे. आज सकाळी उठल्यावर माझ्या खांद्यावर जगाचं ओझं नव्हतं. मला इतकं चांगलं वाटेल, यावर विश्वास बसत नाही. कंपनीत राहिलेल्यांसाठी आणि ग्राहकांसाठी मला वाईट वाटतं, पण कामाशी संबंधित अनेक समस्या होत्या, ज्या आता माझ्या जबाबदारीत नाहीत.
माझ्याकडे मोठा आर्थिक साठा आहे. मी माझे शेअर्स सर्वोच्च दरावर विकले आहेत. या उन्हाळ्यात निवृत्तीची योजना आधीच आखली होती. आता मला सेव्हरन्स पॅकेज मिळणार आहे आणि बेरोजगारी भत्ताही मिळेल. त्यामुळे काही काळासाठी माझ्यासाठी ही 'पेड रिटायरमेंट'च आहे. आज लॉग इन करावं लागलं नाही, यामुळे मला आनंदाश्रू आले. थँक यू ओरॅकल!"
First Day And I'm Refreshedby u/buffalofloyd in employeesOfOracle
दुसरी बाजूही तितकीच वेदनादायक
मात्र, सर्वांनाच असा दिलासा मिळालेला नाही. एका दुसऱ्या व्हायरल पोस्टमध्ये एका कर्मचाऱ्याच्या मुलाने अत्यंत वेदनादायक अनुभव मांडला आहे.
"माझ्या वडिलांनी २० वर्षे ओरॅकलमध्ये काम केलं, तेही एकाच बॉसखाली. निवृत्तीला फक्त २ वर्षे बाकी असताना त्यांना एका ईमेलद्वारे कामावरून कमी करण्यात आलं. एक साधा फोन कॉलही नाही. या कंपन्या निर्दयी आहेत. पुढील २ वर्षे त्यांनी काय करायचं?, त्यांना कॅन्सर आहे आणि आता त्यांच्याकडे आरोग्य विमाही उरलेला नाही."
After 20 years and 2 years before retirement, my dad just got laid off via Emailby u/TattoosAndBeers in employeesOfOracle
प्रतिक्रिया उमटल्या
या दोन पोस्ट्समधून एकाच घटनेचे दोन टोकाचे परिणाम समोर आले आहेत. काहींसाठी ही नोकरकपात नव्या आयुष्याची सुरुवात ठरली, तर काहींसाठी ती मोठा धक्का ठरली. सोशल मीडियावर या प्रकरणावर जोरदार चर्चा सुरू असून, कॉर्पोरेट जगतातील नोकरीची अनिश्चितता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

