Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Thane : पुनर्विकास जोरात, रस्ते कोमात! अवजड वाहतुकीचा परिणाम

Thane : पुनर्विकास जोरात, रस्ते कोमात! अवजड वाहतुकीचा परिणाम

ठाणे : शहरातील कोपरी भागात पुनर्विकासाच्या धडाक्यात चेहरामोहरा बदलत असताना, महापालिकेच्या निकृष्ट रस्ते बांधकामाचा बोजवारा उडाला आहे. अवजड वाहनांच्या वाढत्या वर्दळीचा ताण सिमेंट-काँक्रीटचे रस्तेही पेलू शकले नसून, कोपरी प्रभाग समितीसमोरील सुदर्शन कॉलनीकडे जाणारा रस्ता चक्क खचला आहे.

ऐन पावसाळ्यात रस्त्यांच्या अवस्थेमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या निर्णयामुळे महापालिकेच्या भोंगळ कारभारावर संताप व्यक्त होत आहे.

ठाणे पूर्व कोपरी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्यामुळे बांधकाम साहित्याची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची वर्दळही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या वाहनांच्या सततच्या वाहतुकीचा भार रस्त्यांवर पडत असताना, रस्त्यांची क्षमता आणि बांधकामाचा दर्जा याकडे पुरेसे लक्ष देण्यात आले का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. या संदर्भात कोपरी प्रभाग समिती बांधकाम विभागाशी सापर्क साधला असता सदरचा रस्ता पाहणी करून दुरुस्त केला जाईल, असे सांगण्यात आले. कोपरी प्रभाग समितीसमोरील सुदर्शन कॉलनीकडे जाणाऱ्या सिमेंट-काँक्रीटच्या रस्त्यावर भेगा पडून तो दुभंगल्याचे चित्र समोर आले आहे. सिमेंट-काँक्रीटचे रस्ते अधिक टिकाऊ असल्याचा दावा केला जात असताना प्रत्यक्षात त्यांची दूरवस्था झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. यापूर्वी ठाणे पूर्व आणि कोपरी परिसरात रस्ते खचण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे रस्ते बांधकामाच्या गुणवत्तेची तपासणी करण्याची मागणी जोर धरत आहे.

रस्ते दुभंगण्याबरोबरच परिसरातील अनेक चेंबरची झाकणे रस्त्याच्या पातळीपेक्षा खाली दबलेली आहेत. त्यामुळे विशेषतः दुचाकीस्वारांसाठी अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. जिजामाता मार्गावरील चेंबरची झाकणे रस्त्याच्या पातळीखाली गेल्याचा प्रश्न यापूर्वीही निर्माण झाला होता. त्यामुळे महापालिकेला ही झाकणे बदलण्याची वेळ आली होती. कोपरी परिसरातील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला वेग मिळत असल्याने भविष्यात या भागात टोलेजंग इमारतींची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. त्यासोबतच वाहनांची संख्या, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, रस्ते आणि वाहतूक व्यवस्थेवरील ताणही वाढणार आहे. मात्र सध्याच्याच पायाभूत सुविधा ताण सहन करू शकत नसतील, तर भविष्यातील परिस्थिती काय असेल, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

दर्जेदार रस्ते हा नागरिकांचा अधिकार

पुनर्विकासाला विरोध नाही; पण नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही. रस्ते दुभंगत असतील तर कामाच्या दर्जाची तातडीने चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी. अपघाताची वाट न पाहता पालिकेने कायमस्वरूपी उपाय करावेत. करदात्या नागरिकांना दर्जेदार रस्ते मिळणे हा अधिकार आहे, उपकार नव्हे, असे नागरिकांनी स्पष्ट केले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Navshakti