Dailyhunt
US-Iran-Israel War : वैमानिकाची थरारक सुटका; अमेरिकेची 'ऐतिहासिक' मोहीम : शेकडो कमांडो, डझनभर लढाऊ विमानांचा सहभाग

US-Iran-Israel War : वैमानिकाची थरारक सुटका; अमेरिकेची 'ऐतिहासिक' मोहीम : शेकडो कमांडो, डझनभर लढाऊ विमानांचा सहभाग

वॉशिंग्टन : इराणने पाडलेल्या लढाऊ विमानातील बेपत्ता अमेरिकी वैमानिकाला शोधून त्याची सुटका करण्यात यश आले आहे. याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी पहाटे सोशल मीडियावर माहिती दिली.

दरम्यान, आमच्या हद्दीतून वैमानिक सुटला असला तरी हा अमेरिकेचा पराभवच आहे, असे इराणने म्हटले आहे.

शुक्रवारी इराणने एफ-१५ हे लढाऊ विमान पाडल्यानंतर अमेरिकेने इराणच्या डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणावर शोध आणि बचाव मोहीम सुरू केली होती, तर दुसरीकडे इराणने "शत्रू वैमानिक" पकडून देणाऱ्याला साठ हजार डॉलरचे बक्षीस जाहीर केले होते. या विमानातील दुसरा वैमानिक पूर्वीच सुखरूप बाहेर पडला होता.

हा वैमानिक इराणच्या हाती लागला तर अमेरिकेची मोठी नामुष्की झाली असती. त्यामुळे गेले दोन दिवस त्याच्या सुटकेसाठी मोहीम राबवली जात होती. अखेर शनिवारी चार एप्रिलच्या रात्री अमेरिकेच्या विशेष कृती दलाने अत्यंत धाडसी व तितक्याच जोखमीची कारवाई केली आणि थेट इराणमध्ये प्रवेश केला. या मोहिमेत एकाही अमेरिकन सैनिकाचा मृत्यू झाला नाही.

इराणमध्ये अडकलेला हा वैमानिक अधिकारी बीकन आणि एका सुरक्षित संपर्क साधनाच्या माध्यमातून बचाव पथकाच्या संपर्कात होता. जेव्हा अमेरिकन कमांडो त्या अधिकाऱ्याजवळ पोहोचले, तेव्हा जोरदार गोळीबार सुरू झाला. अमेरिकन लढाऊ विमानांनी अधिकाऱ्याच्या ठिकाणाजवळून जाणाऱ्या इराणी ताफ्यांना दूर ठेवण्यासाठी त्यांच्यावर बॉम्बफेक केली. या मोहिमेत डझनभर लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर्स आणि सायबर व गुप्तचर क्षमतांचा वापर करण्यात आला.

मोहिमेदरम्यान अमेरिकेची दोन C-130 मालवाहू विमाने तांत्रिक बिघाडामुळे इराणमध्येच अडकली होती. ती शत्रूच्या हाती लागू नयेत म्हणून अमेरिकन सैन्याने ती स्वतःच बॉम्बने उडवून दिली. जखमी अधिकाऱ्याला इराणमधून थेट कुवैत येथील लष्करी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

हा अधिकारी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या हाती लागू नये म्हणून अमेरिकेने शेकडो कमांडो आणि डझनाहून अधिक विमाने या मोहिमेत उतरवली. जेव्हा अमेरिकन हेलिकॉप्टर्स बचाव कार्यासाठी उतरले, तेव्हा इराणच्या पायदळाशी त्यांचा मोठा सामना झाला. इराणचे सैनिक अधिकाऱ्याच्या लोकेशनपासून 3 किलोमीटरच्या टप्प्यात आले असताना, अमेरिकन 'रीपर' ड्रोननी त्यांच्यावर थेट क्षेपणास्त्र हल्ला करून त्यांना रोखून धरले.

अमेरिकेच्या ग्राऊलर विमानांनी इराणच्या रडार यंत्रणेत 'जॅमिंग' करून ती बाद ठरवली होती. शिवाय रडारच्या नजरेत येऊ नये म्हणून अमेरिकन हेलिकॉप्टर्सनी डोंगरांच्या आडोशाने अतिशय कमी उंचीवरून प्रवास केला.

१. ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, "हा शूर वैमानिक इराणच्या धोकादायक डोंगराळ भागात शत्रूच्या तावडीत होता. शत्रू त्याच्याजवळ पोहोचत होते." ते पुढे म्हणाले की, वैमानिक जखमी असला तरी तो लवकरच बरा होईल. त्याच्या बचावासाठी "डझनभर विमाने" वापरण्यात आली आणि त्याचे स्थान २४ तास सतत ट्रॅक केले जात होते.

२. शुक्रवारी, इराणने अमेरिकेचे एक एफ १५ स्ट्राइक ईगल विमान पाडले. विमान कोसळल्यानंतर दोन्ही वैमानिकांनी बाहेर उडी मारली. एका वैमानिकाची त्वरित सुटका करण्यात आली, परंतु शस्त्रास्त्र अधिकारी शत्रूच्या प्रदेशात अडकला आणि केवळ एका पिस्तुलासह ४८ तास लपून राहिला. या भागात इराण सरकारच्या विरोधात असलेल्या समूहांची मोठी वस्ती असल्याने हा वैमानिक बचावला. त्याचा एका विशेष यंत्रणेमार्फत अमेरिकी सैन्याशी संपर्क होता.

ट्रम्प यांची शिवीगाळ, तळतळाट; होर्मुझ खुली करा, अन्यथा नरकात जाल!

वॉशिंग्टन : होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याबरोबरच अन्य मागण्या ४८ तासांत मान्य न केल्यास नरकात जाल, अशा शब्दांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अखेरचा इशारा दिला आहे. तसे करताना त्यांनी असभ्य शिव्यांचाही प्रयोग केला आहे. इराणने शांतता करारासाठी ट्रम्प यांनी दिलेली ६ एप्रिलची मुदत पाळावी, अन्यथा सर्वत्र विनाश ओढवेल, असा इशारा त्यांनी दिला. इराणसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला 'होर्मुझची सामुद्रधुनी' हा मार्ग पुन्हा सुरू करण्यासह इतर अटी पूर्ण कराव्यात, अशी मागणी ट्रम्प यांनी केली आहे. या मुदतीत तोडगा न निघाल्यास इराणवर मोठी कारवाईचे संकेत ट्रम्प यांनी दिल्याने दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. ट्रम्प यांच्या इशाऱ्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली असून पुढील ४८ तास अत्यंत कळीचे ठरणार आहेत. दरम्यान, इराणने मात्र हा इशाराही फेटाळून लावला असून राष्ट्राध्यक्षांना ही भाषा शोभते का, असा सवाल केला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Navshakti